आलेले आहेत ही पूर्ण जाणीव त्यांच्या चित्तामध्ये असल्यामुळे वारंवार नारदांनी द्वारकेला यावं. निमंत्रण दिल्यावर पुण्यकर्माला तर यायचेच परंतु एरवीसुद्धा त्यांनी द्वारकेला यावं आणि राहावं.
कृष्णांच्या जवळ राहावं, उपासना करावी, भक्ती करावी, त्यांचं भाषण ऐकावं, त्यांचं रूप पाहावं ही इच्छा आहे. भगवंताच्या चरणांची उपासना करावी असं कुणाला वाटणार नाही म्हणाले. वसुदेव देवकींनि एकदा घरी आलेल्या नारदांची पूजा केली. नमस्कार केला. नारदांपासून काही उपदेश प्राप्त व्हावा अशा उद्देशाने वसुदेवाने विचारलं, "महाराज, आपला संचार हा सर्व जीवांच्या कल्याणाकरताच अखंड चालू आहे. त्यात आपला स्वार्थ काही नाही. देवांचं चरित्र हे सुखदायकही होतं, कधी दुःखदायकही होतं परंतु आपल्यासारखे जे भगवद्भक्त साधू आहेत त्यांच्यापासून नेहमी सुखच प्राप्त होतं. तेव्हा, भागवतधर्म म्हणजे काय हे मला आपण समजावून सांगा. हा पहिला प्रश्न आहे. या भागवतधर्माच्या श्रवणाने सुद्धा मनुष्य बंधनातून मुक्त होतो. भगवंताची पूजा पूर्वी माझ्या हातून घडली म्हणाला वसुदेव पण मोक्षाकरता काही माझी सेवा घडली नाही या मायामोहामुळे. या संसार संकटातून आपण मला मुक्त करा अशी प्रार्थना वसुदेवाने केल्यावर देवर्षि नारदांना भगवान नारायणांचं स्मरण झालेलं आहे. ते सांगताहेत, "वसुदेवा तुझा प्रश्न चांगला आहे. विश्वद्रोह करणारासुद्धा या भागवतधर्माच्या आचरणाने पवित्र होऊन जातो. भगवान नारायणांचं स्मरण यावेळई मला झालेलं आहे तुला एक पूर्वीचा इतिहास सांगतो. मनुराजाचा पुत्र प्रियव्रत. त्याचा मुलगा आग्निध्र आणि त्याचा मुलगा नाभीराजा आणि नाभीचा पुत्र ऋषभदेव. वासुदेवच प्रत्यक्ष ऋषभरूपाने अवतीर्ण झाले. मोक्षधर्म आचरण करून दाखवणारे असे ते होते. त्यांना शतपुत्र झाले. त्यातील ज्येष्ठ पुत्राचंमच नाव या देशाला भारतवर्ष असं पडलेलं आहे. त्याने अनेक वर्ष राज्य केले, यज्ञ करून, त्याग करून वनामध्ये गेला आणि तिसऱ्या जन्मामध्ये तो मुक्त झालेला आहे. ऋषभदेवांची एक्याऐंशी मुलं ही द्विजाती झाली असं म्हणतात. म्हणजे क्षत्रिय होतेच ते पण, कर्मयोगाचे आचरण करणारी, त्यांचं लक्ष यज्ञ-यागादि कर्माकडे जास्ती होतं. नऊ मुलं ही मोठी भगवद्भक्त झालेली आहेत. पूर्ण ज्ञानसंपन्न असे ते झालेली आहेत. कवि, हरी, अंतरिक्ष, पिप्पलायन, आविर्होत्र, प्रबुद्ध, द्रुमिल, चमस आणि करभाजन. हे नऊ योगी झाले. संपूर्ण विश्व जे आहे कार्यकारणात्मक हे आत्म्यापेक्षा वेगळं नाहीच आहे. आत्मा-परमात्माच विश्वरूपाने भासतो आहे अशी दृढ भावना त्या योग्यांच्या चित्तात होती आणि त्यांचं भ्रमण सारखं चाललेलं आहे. देवलोकात, गंधर्वलोकात अनेक ठिकाणी त्यांचा संचार चालू असे. असे संचार करता करता
ते निमि राजाच्या यज्ञामध्ये प्राप्त झाले. सूर्यासारखे तेजस्वी ज्ञानी, भगवद्भक्त महात्मे आलेले पाहून सर्व ऋषीमंडळी उठून उभी राहिली. नारायणांचे हे भक्त आहेत हे समजून निमि राजाने त्या योगीद्रांची पूजा केली. आसनावर बसलेले आहेत आणि विदेह राजाने विचारायला सुरवात केली, "महाराज आपण साक्षात भगवंताचे सेवक आहात. आपल्यासारखे विष्णूभक्त हे लोकांना पवित्र करण्याकरता सर्वत्र संचार करत असतात. मनुष्यदेह हा अतिशय अस्थिर आहे. केव्हा पडेल याचा नियम नाही. आणि या देहाची प्राप्ती झाली असताना आपल्यासारख्या भगवद्भक्तांचं दर्शन होणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. आज दैव योगाने दर्शन झालेलं आहे. थोडा वेळ का होईना संगती लाभलेली आहे. तेव्हा भागवतधर्म म्हणजे काय आपण मला सांगा म्हणजे भगवत्कृपा प्राप्त होईल. नारद सांगतात, वसुदेवा, याप्रमाणे निमिराजाला विचारल्यानंतर त्यापैकी जे कवी नावाचे योगीद्र होते. त्यांनी बोलायला आरंभ केला,
मन्येऽकुतश्चिद्भयमच्युतस्य
पादांबुजोपासनमत्र नित्यम् ।
उद्विग्नबुद्धेरसदात्मभावाद्
विश्वात्मना यत्र निवर्तते भीः ।।
11.2.33 ।। श्री. भा.
सर्वही भीती दूर करणारं साधन म्हणजे श्रीहरीच्या चरणाची उपासना हे आहे. कोणीही जीव, अगदी ब्रह्मदेवांपर्यंत कोणीही जीवात्मा असला तरी उद्विग्न असतो. असत पदार्थालाच आत्मा समजून बसलेला आहे. प्रल्हादजींनीही आपल्या पित्याला प्रथम असंच उत्तर दिलेलं आहे. असदात्म भाव जो मनामध्ये आहे अज्ञानी जीवांच्या ते खोटं असून खरं समजून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना उद्वेग भोगावा लागतो. त्या उद्वेगातून बाहेर येण्यासाठी भगवंतांच्या चरणांची उपासना, भजन हेच एकमेव निर्भय करणारं साधन आहे. स्वतः भगवंतांनी आपली प्राप्ती होण्याकरता जे धर्म सांगितले आहेत त्यांनाच भागवतधर्म असं म्हणतात. भागवतधर्म म्हणजे राजमार्ग आहे. कधीही तो स्खलित होत नाही, एका श्लोकामध्ये भागवतधर्माची कल्पना केलेली आहे.
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
बुद्ध्याऽऽत्मना वा अनुसृतस्वभावात् ।
करोति यद्यत् सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
11.2.36 ।। भा.
शरीराने कर्म होतात, वाणीने होतात. त्याचप्रमाणे बुद्धीने, मनाने, इंद्रियांनी, पूर्ववासना संस्कार जे असतील त्याला अनुसरूनही कर्म होतात. अशी जी जी कर्मे या साधनांच्या द्वारा घडतील ती सर्व कर्मे नारायणाला समर्पण करावीत. कर्ता मी नसून नारायण आहे. ह्या सगळ्यांना तो प्रवर्तक आहे ना ! त्याच्याचमुळे या सर्व जडपदार्थांची प्रवृत्ती होते आहे. तेव्हा या जड पदार्थांचंमच कर्तृत्व मानण्यापेक्षा त्या नारायणाचंमच कर्तृत्व माना. जडपदार्थांमध्येसुद्धा आत्मभाव निर्माण झाल्यामुळे आपलं कर्तृत्व आपण मानतो तेही योग्य नाही. फक्त नारायणच कर्ता आहे. त्याला सर्व कर्म समर्पण करा. ही जर भावना प्रत्येक कर्म करताना होत असेल तर सर्वही कर्मे ही भागवतधर्म होतात.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ।।
9.27 ।। श्री.भ.गीता
मनामध्ये जोपर्यंत द्वैताचा अभिनिवेश आहे तोपर्यंत भीती आहे. द्वैताभिनिवेशामुळे जीव हा ईश्वरापासून पराङ्मुख होतो आहे. आणि संकल्प विकल्पात्मक मनाने, केलेलं कर्म मीच केलेलं आहे अशा अहंकारात तो सापडतो आणि त्या कर्मबंधनात पडतो आहे. त्या मनाचा प्रथम निरोध केला पाहिजे. भगवान श्रीहरींनी केलेली जी दिव्य कर्मे आहेत ती श्रवण करणं, सर्व एकंदर लज्जा सोडून त्या लीलांचं वर्णन, गायन करणं, हा जर अभ्यास सुरू झाला तर अंतःकरणामध्ये ईश्वराबद्दल अनुराग उत्पन्न होतो. त्याचं भान सगळं नाहीसं होतं, चित्त द्रुत होतं आणि सर्व अभ्यास सगळे शिथिल होऊन जातात. संपूर्ण जे पांचभौतिक विश्व आहे हे भगवंताचं शरीर आहे. म्हणून सर्वही भूतांना वंदन करावं. शेवटी उद्धवजींना भगवंतानी ही वंदन भक्तीच सांगितली. असा भक्तीचा अभ्यास सुरू झाला असताना, परमात्मस्वरूपाचा अनुभव येतो, वैराग्य उत्पन्न होतं आणि पराभक्तीही उत्पन्न होते आहे. पूर्ण शांती त्या जीवाला प्राप्त होते. हे सगळे भागवतधर्म या रूपाने त्यांनी शिकवलेले आहेत. निमिराजाला विचारलं, ""महाराज, भगवद्भक्त कसा असतो, त्याचं लक्षण काय आहे ?'' हरी नावाचे दुसरे योगींद्र या प्रश्नाचं उत्तर देताहेत. ""उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि प्राथमिक भक्त असे तीन प्रकार आहेत.
सर्वभूतेषु यः पश्येद् भगवद्भावमात्मनः ।
भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः ।।
11.2.45 ।। श्री. भा.
उत्तम भक्त म्हणजे जो सर्व भूतांच्या ठिकाणी भगवान पाहतो आहे. भूतस्वरूपाच्या
ठिकाणी वृत्ति ठेवून त्यांनाच भगवान म्हणणं. किंवा भूतस्वरूपाचा अपलाप करून, भगवानच याठिकाणी आहेत असं समजणे उपासनेमध्ये दोन्हरी अंगं आहेत. मूर्तीलाच भगवान समजणं किंवा मूर्ती नसून प्रत्यक्ष भगवानच आहेत असं समजणं; दोन्हीही प्रकार आहेत. उत्तम भक्ताला अभेद आहे. भूतं असली तरी ती भगवंतस्वरूप आहेत आणि नसली तरी भगवंत आहेच. अधिष्ठान प्रधान दृष्टी आणि प्रतीकप्रधान दृष्टी.
आता मध्यम भक्त. ईश्वराबद्दल अत्यंत प्रेम मनामध्ये आहे. ईश्वरभक्तांबद्दल मैत्रीभावना आहे. अज्ञानी लोकांबद्दल दया आहे आणि जे काही ईश्वर द्वेषी असतील, नास्तिक त्यांची उपेक्षा आहे. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचा नाही. असं ज्याचं वर्तन आहे तो मध्यम भक्त आहे. लोकसंग्रह या भूमिकेवर आहे. उपेक्षाही लोकसंग्रहाकरताच आहे. त्याशिवाय यांचं चित्त प्रसन्न राहणार नाही.
आणि प्राथमिक भक्त म्हणजे,
अर्चायामेव हरये पूजां यः श्रद्धयेहते ।
न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृतः स्मृतः ।।
11.2.47 ।। श्री. भा.
समोर जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या ठिकाणीच श्रद्धा आहे. पूजा अर्चा मूर्तीची चाललेली आहे. हाच तेवढा ईश्वर आहे. बाकीच्या ईश्वरभक्तांकडेही लक्ष नाही आणि इतरांकडेही नाही. हा सामान्य, प्राथमिक भक्त आहे. हे तीन प्रकार सांगितले योगीद्रांनी राजाला आणि आता शेवटपर्यंत उत्तम भक्तांमचंच वर्णन करताहेत.
सर्व विषयांचं सेवन करतासुद्धा ज्याला राग, द्वेष नाही. हर्ष नाही, विषाद नाही. ही सगळी विष्णूंची माया आहे असं उत्तम भक्त समजतो आहे. कोणताही मोह त्याच्या चित्ताला नाहीये.
न कामकर्मबीजानां यस्य चेतसि सम्भवः ।
वासुदेवैकनिलयः स वै भागवतोत्तमः ।।
11.2.50 ।। श्री. भा.
चित्त फक्त वासुदेवाच्या ठिकाणी स्थिर आहे. त्यामुळे त्याच्या चित्तामध्ये काम नाही. त्यामुळे त्यापासून निर्माण होणारं कर्म नाही आणि त्यालाही कारण असलेलं अज्ञान बीजही नाहीये. सर्वांतून तो मोकळा आहे. आपण अमुक वर्णाचे, अमुक जातीचे, अमुक आश्रमाचे आहोत असा अभिमान ज्याच्या चित्तामध्ये नाही तो भगवत्प्रिय आहे. त्रिभुवनाचं ऐश्वर्य मिळण्याची वेळ आली
तरीसुद्धा ज्याच्या चित्तातलं भगवत्स्मरण कधीही खंडित होत नाही. देवाला जो विसरत नाही, देवाला जो सोडत नाही तो मोठा भक्त खराच परंतु देव ज्याच्या हृदयातून जाऊ शकत नाही असा भक्त देवांहूनही मोठा झाला.
विसृजति हृदयं न यस्य साक्षात्
हरिः अवशाभिहितोऽपि अघौघनाशः ।
प्रणयरशनया धृतांघ्रिपद्मः
स भवति भागवतप्रधान उक्तः ।।
11.2.55 ।। श्री. भा.
ज्याने भगवंताला हृदयामध्ये अत्यंत दृढपणे धारण केलेलं आहे त्याच्या हृदयातून हरी बाहेर जाऊ शकत नाही. सूरदासांनी श्रीकृष्णांना सांगितलं,
हृदयात् यदि जातोसि पौरुषं गणयामि ते ।।
भगवंता, मी म्हातारा आहे, दिसत नाही मला. मला हाताला धरून नेत असता एकदम बाजूला होतोस, माझा हात सोडून देतोस, याला मी पौरुष समजत नाही. माझ्या हृदयातून तू जाऊन दाखव, कसा जातोस ते पाहतो. ईश्वराला सुद्धा आव्हान देण्याची ज्यांची भूमिका आहे ते श्रेष्ठ भक्त आहेत. ईश्वराच्या कृपेनेच त्यांनी ती भूमिका मिळवली म्हणून त्यांना अहंकार नाही. माझ्या हृदयात भगवंत आहे, मी त्याला बंदिस्त करून ठेवला आहे असं काही या भक्तांना वाटत नाही पण ते योगीद्र वर्णन करताहेत. हा प्रधान भगवद्भक्त आहे.
परस्य विष्णोरीशस्य मायिनामिप मोहिनीम् ।
मायां वेदितुमिच्छामो भगवंतो ब्रुवंतु नः ।।
11.3.1 ।। श्री. भा.
ज्ञानसंपन्न महात्मे ईश्वराच्या कृपेने आलेले आहेत. काहीही विचारलं तरी 'छिद्यंते सर्वसंशयः' असं करण्याची, फळ देण्याची यांची योग्यता आहे. त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यावं अशी इच्छा राजाला झाली.
राजाचा तिसरा प्रश्न आहे. ""सर्व लोकांना मोहात टाकणारी भगवान विष्णूंची माया म्हणजे काय आहे ?'' भगवत्स्वरूपही अनिर्वचनीय आहे. शब्दांनी यथार्थ वर्णन होत नाही. आणि त्यांची शक्तीही अनिर्वचनीय आहे. मायेचं वर्णनही करता येत नाही. तटस्थ लक्षणच सांगितलेलं आहे मायेचं. साक्षात मायाशक्ती काय आहे हे सांगता येत नाही. किंवा कार्याद्वारा मायेचं ज्ञान करून द्यावं लागतं. मायेचा आणि कार्याचा संबंध आहे. योगीद्र अंतरिक्ष सांगताहेत, "राजा, माया
म्हणजे काय सांगता येत नाही. मायेचं कार्य काय काय चालू आहे हे तुला सांगतो.
एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतैर्महाभुज ।
ससर्ज उच्चावचानि आद्यः स्वमात्रात्मप्रसिद्धये ।।
11.3.3 ।। श्री. भा.
भगवंतानी या पंचभूतांपासून सर्वही ब्रम्हांडं, ही भौतिक सृष्टी निर्माण केली. त्या पंचभूतांच्यामध्ये आपण प्रवेश केला, जीवरूपाने आणि सर्व विषयांचं ग्रहणही तो करू लागला. तो जीवरूपी परमात्मा त्या कर्माच्या ठिकाणी आसक्त झाला. कर्म करतो आहे, पुन्हा देह धारण करतो आहे, पुन्हा कर्म करतो आहे. कर्मफलाचा भोग घेतो आहे आणखी फिरतो आहे सारखा. अशा रितीने अनेक कर्मानुसार अनेक जन्म प्राप्त होतात. महाप्रलयापर्यंत हे सर्व चालू राहातं. काल जो आहे तो या विश्वाला अव्यक्ताकडे न्यायला लागतो. प्रलयाच्यापूर्वी शंभर वर्ष अनावृष्टी होते. सूर्याचे किरण अत्यंत तापतात. सगळं त्रैलोक्य तप्त होऊन जातंय. संकर्षण भगवानांच्या मुखातूनही अग्नी उत्पन्न होतो पाताळातून आणि त्याच्या ज्वाळा वर येतात. यामुळे सर्व ब्रम्हांड हे दग्ध होऊन जातंय. आणि मग पाऊस पडायला सुरुवात होते. हत्तीच्या सोंडेप्रमाणे धारा असलेला पाऊस पडतो. आणि हे संपूर्ण विराट स्वरूप जे आहे ते विलीन होऊन जातंय. अव्यक्तामध्ये त्याचा विलय होतो. भूमी, जल, तेज, वायू, आकाश, महत्व, प्रकृति, परब्रह्म अशा क्रमाने सगळं अव्यक्त होत जातं. सृष्टीही अशी होते आणि प्रलयही होऊन जातो. या कार्यालाच माया असं म्हणायचं. हे सगळं सतत चालू आहे. कुणीही थांबवू शकत नाही.
पुढचा प्रश्न राजाने केला,
यथैतां ऐश्वरीं मायां दुस्तरां अकृतात्मभिः ।
तरन्ति अञ्जः स्थूलधियः महर्ष इदमुच्यताम् ।।
11.3.17 ।। श्री. भा.
यातून जीवाला बाजूला होता येत का नाही? सृष्टी-प्रलय सारखं चाललेलं आहे. आणि हा जीवात्मा त्यात सापडलेला आहे, आपण ईश्वर आहे याचं त्याला भानही नाही. संसारी आहे, कर्ता भोक्ता मी आहे असं तो समजतोय. प्रलयाच्यावेळीही याचा प्रलय होत नाही. सूक्ष्मरूपाने, संस्काररूपाने हा राहतो आणि सृष्टी पुन्हा निर्माण झाली की पुन्हा जन्म घेतो. सर्व जीवात्मे त्यावेळी पुन्हा व्यक्त होतात. योगीद्र प्रबुद्ध सांगताहेत, "राजा सर्वही जीव नित्य कर्म करण्यात गुंतलेले आहेत. आपली दुःखं दूर व्हावीत आणि सुख आपल्याला मिळावं याकरता त्यांचा प्रयत्न चालू असतो. सगळ्यांची कर्मे चालू आहेत परंतु ज्याच्या मनामध्ये विवेक उदयाला आलेला आहे
त्याने विचार करावा की कर्माचं फळ आपल्या इच्छेप्रमाणे मिळवू शकतात का हे जीव? एखाद्या जीवालाच असा विवेक उत्पन्न होतो. दुःखनाश आणि सुखप्राप्ती पाहिजे आहे पण उलटंच घडते. दुःखाचीच प्राप्ती होते आणि सुख नाहीसं होतं. हे कर्माचं फळ जे आहे, कर्म परिपाक हा असा दिसतो. जास्तीत जास्त जीवांच्या बाबतीत असंच घडतं आणि त्यामुळे कर्म हे दुःखनाश करण्याचं किंवा सुख मिळवण्याचं साधन आहे हा कार्यकारणभाव व्यभिचारी ठरतो. कार्यकारणभाव आहे असं समजून प्रवृत्ती होते ना ! विवेक उत्पन्न झाल्याबरोबर कार्यकारणभाव नाहीये हे कळतं. शिवाय इतर पोषक असे पुष्कळ विवेक आहेत.
नित्यमार्तिदेन वित्तेन ।।
11.3.19 ।। श्री. भा.
द्रव्याच्या योगाने नेहमी क्लेश आहेत. गृह आहे, अपत्य आहे, आप्त आहेत, पशू वगैरे आहेत, क्षेत्र आहे, सगळं जरी आपण प्रयत्नाने मिळवलं
का प्रीतिः साधितेश्चलैः ।।
11.3.19 ।। श्री. भा.
हे टिकणारं काहीच नाही ना ? स्थिर नाही. तेव्हा हे मिळवून समाधान काय मिळणार आहे? हे झालं इहलोकातलं. याप्रमाणे कर्माने प्राप्त करून घेतलेले स्वर्गादि लोक वगैरे जे आहेत तेही नश्वर आहेत. ते सुख शेवटपर्यंत मिळत नाही, मर्यादित आहे. त्याठिकाणीसुद्धा आपल्या बरोबरीचे, आपल्यापेक्षा अधिक सुख भोगणारे आणि शेवटी नष्ट होणारे असे दोष आहेतच. हा विवेक मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर जिज्ञासू होऊन आपलं खरं कल्याण कसं प्राप्त होईल याचा विचार करून त्याने सद्गुरूंना शरण जावं. 'शाब्दे परेच निष्णातम्' असे गुरू भेटणं फार कठीण आहे आणि त्यांच्याजवळ राहून भागवतधर्माचं शिक्षण घ्यावं.
सर्वतो मनसोऽसंगम् ।।
11.3.23 ।। श्री. भा.
कोणतं कोणतं शिक्षण घ्यावं ते सांगताहेत. अगोदर असंग मन करायचा प्रयत्न करावा. त्याकरता साधूंचा संग ठेवावा. आपल्यापेक्षा कमी असलेले अज्ञानी, त्यांच्याबद्दल दया, बरोबरीचे असतील त्यांच्याशी मैत्री आणि श्रेष्ठ जे असतील त्यांच्यासमोर विनय याचाही अभ्यास करावा. पावित्र्य पाहिजे आहे. काया, वाचा, मन या तिघांचीही पवित्रता, शुचिता पाहिजे. स्वच्छता निराळी आणि शुचिता निराळी आहे. तितिक्षा पाहिजे. इंद्रियांचा निग्रह पाहिजे, मंत्रजप पाहिजे. अहिंसेचाही अभ्यास पाहिजे. सर्वत्र परमात्मभावनेचाही अभ्यास झाला पाहिजे. संतोषवृत्तीचा अभ्यास झाला पाहिजे. मन, वाणी वगैरे यांचा निग्रह केला गेला पाहिजे. भगवंतांच्या गुणांचं
श्रवण, कीर्तन, ध्यान हे सगळं घडलं पाहिजे. जे जे आपल्याकडून धर्मकार्य होईल, पुण्यकर्म होईल किंवा ज्या ज्या ठिकाणी आपली ममता आहे. स्त्री आहे, पुत्र आहे, घरदार आहे, इंद्रिय वगैरे हे सगळं ईश्वराचं आहे, हे लक्षात ठेवावं. भगवद्भक्तांची यथाशक्ती सेवा करावी. एकमेकांनी भगवंताच्या लीला वर्णन, गायन कराव्यात आणि तो आनंद प्राप्त करून घ्यावा. असा अभ्यास करणारे जे आहेत त्यांच्या अंतःकरणात भक्ती उत्पन्न होते. प्रेम निर्माण होतं. आणि त्या भक्तीचे सात्विक भाव उत्पन्न होतात. अंगावर रोमांचं येतात, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहताहेत, देहभान नाहीसं होतं आणि पूर्ण शांती त्यांच्या चित्ताला प्राप्त होते. असा जीव
नारायणपरो मायां अञ्जस्तरति दुस्तराम् ।।
11.3.33 ।। श्री. भा.
त्या सृष्टी प्रलयात्मक मायेतून तरून जातो. त्याला जन्म मरण राहात नाही.
निमि राजा विचारतोय, "नारायण कोण आहे महाराज. परब्रह्म परमात्मा ज्याला म्हणतात त्याचं स्वरूप मला समजावून सांगा." पिप्पलायन योगीद्र सांगताहेत,
स्थित्युद्भवप्रलयहेतुरहेतुरस्य
यत् स्वप्नजागरसुषुप्तिषु सद् बहिः ।
देहेन्द्रियासुहृदयानि चरन्ति येन
सञ्जीवितानि तदवेहि परं नरेन्द्र ।।
11.3.35 ।। श्री. भा.
विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याला जो कारण आहे, त्याला कुणी कारण नाही, तो नित्य आहे. त्याचप्रमाणे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति या अवस्थांमध्ये आहे आणि या अवस्था नसताना देखील आहे म्हणजे समाधि अवस्थेत आहे. देह, इंद्रिय, प्राण, मन वगैरे ही ज्यानी संजीवत होऊन कार्य प्रवण होताहेत तेच परब्रह्म आहे. नारायण त्यालाच म्हणतात. शब्दांनीही सांगितलं वर्णन करून. पण शब्द काही साक्षात त्या स्वरूपापर्यंत मनाला नेऊ शकत नाहीत. फक्त कल्पना आहे परोक्षज्ञान झालेलं आहे. मनाने तरी ध्यान केल्यावर होईल का नाही?
नैवात्मनो विशति वाग् उत चक्षुरात्मा ।
प्राणेन्द्रियाणि च यथानलमर्चिषः स्वाः ।।
11.3.36 ।। श्री. भा.
मन या परमात्मस्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही. वाणीही असमर्थ आहे. चक्षु वगैरे इंद्रियंही असमर्थ आहेत. आत्मप्रमाण जो शब्द आहे तो जी जी बोधकप्रमाणं आहेत त्या सर्वांचा
प्रमाणांचा निषेध केला. साक्षात आणि निषेधरूपाने सांगताना हा शब्द नेऊन सोडतो. अध्यारोप, अपवाद यातही निषेध आहेच आहे. मनन भूमिकेमध्ये अध्यारोप आहे, अपवादही आहे. यातही सर्व प्रमाणांचा निषेध करून आत्मतत्वाचा बोध मनाने विचार केला असता होत आहे. पण साक्षात नाही. त्रिगुणात्मक जे आहे अव्यक्त स्वरूप तेच महत्व झालं, तेच अहंकाररूप झालं आणि तेच पुढं जीव झालं अध्यासार्ने. आत्मअध्यास झाल्यामुळे त्याला जीव म्हणतात. हा जो आत्मा आहे याला उत्पत्ति नाही, नाश नाही, वृत्ति नाही, क्षय नाही कोणताही विकार नाही. सर्व ठिकाणी
प्रकाशरूप आहे परमात्मा. ज्ञानस्वरूप आहे. बाकी सर्वही मनाचे विकल्प आहेत.
यर्हि अब्जनाभचरणैषणयोरुभक्त्या
चेतोमलानि विधमेद् गुणकर्मजानि ।
तस्मिन् विशुद्ध उपलभ्यत आत्मतत्त्वं
साक्षात् यथामलदृशोः सवितृप्रकाशः ।।
11.3.40 ।। श्री. भा.
मनही जाणार नाही, शब्दही जाणार नाही, इंद्रियही जाणार नाहीत, कोणतंही प्रमाण जाऊ शकत नाही मग समजायचं कसं ? ज्ञान कसं व्हायचं ? मनाने तरी ज्ञान झालं पाहिजे नाहीतर शब्दाने तरी ज्ञान झालं पाहिजे. पण इथे दोन्हीही पक्ष संभवत नाहीत. त्याकरता एक मुख्य कारण सांगताहेत. बुद्धीने ते आत्मतत्व समजू शकतं. अंतःकरणाने कळू शकतं. पण त्याच्याकरता भगवंतांच्या चरणांची तीव्र भक्ती घडली पाहिजे. अनन्य भक्ती. म्हणजे विरक्ती पाहिजे त्याशिवाय अनन्यता येणार नाही. आणि त्या भक्तीच्या योगाने अंतःकरणात असणारे सर्व मल हे दग्ध होऊन जातात. कर्मांचा नाश होतो. आणि असं शुद्ध अंतःकरण ज्यावेळी होतं तेव्हा तिथे आत्मतत्व प्रकाशित होतंय. आतमध्ये आहेच ते ! डोळ्यावर काही पडदा आला तर नेत्र काही पाहू शकत नाहीत. सूर्यप्रकाशही पाहू शकत नाहीत. ज्या सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने नेत्र हे बाकीच्या सर्व पदार्थांना पाहू शकतात तो सूर्यप्रकाशच त्याला दिसेनासा झाला. आपलीही नेत्राची शक्ती कमी झाली आणि सहकारी सूर्यप्रकाशचंही अदर्शन झालं. पण तीच दृष्टी, आवरण दूर झाल्यावर शुद्ध झाली आणि सूर्यप्रकाश दिसायला लागला जो कधी नाहीसा झालाच नव्हता. तसं परमात्मा आहेच, केव्हाही. अनेक जन्म झाले तरी चित्ताच्या जवळ परमात्मा आहे. चित्तसाक्षी तो आहे. पण चित्त हे अज्ञानामुळे आवृत्त झाल्यामुळे परमात्मा दिसत नाही. परमात्मा आवृत्त झालेला नाही तर
आपलं चित्त आवृत्त झालेलं आहे.
सूर्यापर्यंत आपली दृष्टी जाऊ शकत नाही. मध्ये मेघ आलेले आहेत. आणि आम्ही म्हणायला लागलो, मेघांनी सूर्य झाकला गेला. सूर्य कसा झाकला जाईल ? आमची दृष्टीच आवृत्त झाली आहे. तसं आमचं अंतःकरण हे आवृत्त झालेलं आहे. अज्ञानापासून उत्पन्न झालं आणि अनेक जन्माच्या संस्कारांनी त्या अज्ञानात भरच पडलेली आहे. भगवद्भक्तीच्या योगानेच ते शुद्ध होतं. सगळे मल निघून जातात. आणि मग त्याच्यामध्ये असलेल्या परमात्मरूपाचा प्रकाश पसरतो आहे. त्यामुळे त्या मायाशक्तीचाही तिरोभाव होतो. निमिराजा विचारतोय,
कर्मयोगं वदत नः पुरुषो येन संस्कृतः ।
विधूयेहाशु कर्माणि नैष्कर्म्यं विन्दते परम् ।।
11.3.41 ।। श्री. भा.
आत्तापर्यंत या योगीद्रांनी भक्तीचंच महत्व दाखवलेलं आहे. भागवतधर्म म्हणजे भक्तीच आहे म्हणाले. ती भक्ती अंतःकरणात उत्पन्न झाल्यामुळे ईश्वराच्या शक्तीची जाणीव झाली आणि त्यामुळे स्वतःचं कर्तृत्व तो विसरून गेलेला आहे. कुणालाही कर्तृत्व नाही आणि कुणालाही क्रिया नाही. त्रिगुणात्मक सर्व इंद्रिय आहेत. रजोगुण आहे म्हणजे क्रिया असलीच पाहिजे. नाही म्हणाले. त्याच्या प्रेरणेमुळे, त्याच्या सान्निध्यामुळे क्रिया होते आहे म्हणजे त्रिगुण असूनसुद्धा ते कार्यकारी होऊ शकत नाहीत हेच त्यांनी सांगितलं, विलक्षण आहे. आपोआप कार्य होतात हा सिद्धांत थांबवलेला आहे, भक्तीमार्गाने. क्रिया होईल पण याच्या सान्निध्यामुळे होईल. तर ही भक्तीची महती सांगितली आत्तापर्यंत. भागवतधर्मामध्येसुद्धा भक्तीच्या योगानेच त्या सर्व साधनांचं, धर्माचं अनुष्ठान होईल. ती भक्ती अधिकाधिक वाढत जाईल आणि सर्व अभ्यास शिथिल होत गेल्यामुळे आत्मप्रकाश होईल.
राजाने आता कर्मयोग म्हणजे काय सांगा असं विचारलं. कारण ती भक्तीसुद्धा ऐकायला सोपी आहे पण कठीण आहे. आत्मरूप प्रकाशित करणारी भक्ती म्हणजे केवढी मोठी भूमिका आहे. तसे संस्कार झाले पाहिजेत त्याकरता कर्म झाली पाहिजेत. कर्मयोग सांगा म्हणून राजा म्हणतोय म्हणजे त्या कर्मयोगामुळे संस्कृत झालेल्याची दोषनिवृत्ति होईल आणि आत्मज्ञान त्याला प्राप्त होईल. राजा म्हणाला हा प्रश्न पूर्वी मी ऋषींना विचारला, त्यांनी काही उत्तर दिलं नाही