« Previous | Table of Contents | Next »
पान ५११

मला. आविर्होत्र योगीद्र सांगताहेत,

कर्म अकर्म विकर्मेति वेदवादो न लौकिकः ।
वेदस्य च ईश्वरात्मत्वात् तत्र मुह्यन्ति सूरयः ।।
11.3.43 ।। श्री. भा.

फक्त वेदांनीच हे सांगितलेलं आहे, कर्म कशाला म्हणायचं, विकर्म कशाला म्हणायचं, अकर्म कशाला म्हणायचं. हे लौकिक बुद्धीने कळून येणारं नाहीये. वेद हे ईश्वररूप आहेत. त्याच्या अर्थज्ञानाबद्दल मोठेमोठे ज्ञानसंपन्न महर्षी मोहामध्ये पडताहेत. म्हणून अनेक आणखी मार्ग दाखवले गेले. सांख्यमार्ग आहे, योगमार्ग आहे, कर्ममार्ग आहे अनेक मार्ग आहेत. त्याचं प्रतिपादन त्या त्या ऋषींनी केलेलं आहे. आविर्होत्र सांगताहेत.

तत्र मुह्यन्ति सूरयः ।।
11.3.43 ।। श्री. भा.

त्यांनाच मोह झालेला आहे. वेदाचा खरा अर्थ सांगायला ते असमर्थ आहेत. काही कारणसंशोधन करणं वेगळं पण ईश्वराची इच्छा असेल तरच वेदांचा खरा अर्थ आकलन होईल. वेद हे परोक्षरूपाने सांगणारे आहेत, प्रत्यक्ष काही सांगत नाहीत. सूचक आहेत. अज्ञानी जीवांना मार्गदर्शक आहेत. कर्म करावी म्हणून कर्म केली पाहिजेत. याचा अभिप्राय काय ? अज्ञान्यांकरता आहे म्हणाले,

कर्ममोक्षाय कर्माणि विधत्ते ह्यगदं यथा ।।
11.3.44 ।। श्री. भा.

कर्मातून मुक्त होण्याकरताच कर्म करायची ! कर्म करायची आणि कर्मातून मुक्त व्हायचं म्हणजे फळ हे विरुद्ध दिसतंय. पण ते विरुद्ध नाहीये. विरुद्ध दिसणारं फळ कर्मामुळे मिळतं म्हणाले. वेदोक्त कर्माचा ज्यांनी त्याग केलेला आहे ते विकर्म झाले. तो अधर्म झालेला आहे. त्यामुळे त्याला जन्ममृत्यूमध्ये अखंड पडावं लागतं. निरभिमान होऊन, ईश्वरार्पण बुद्धीने, वेदोक्त कर्म श्रद्धेने करणारा जो आहे त्याला नैष्कर्म्यसिद्धी, ज्ञानसिद्धी प्राप्त होते. अनेक फळं सांगितलेली आहेत.

स्वर्गकामः यजेत ।
इन्द्रियकामः, पारमेष्ठ्यकामः पुत्रकामः ...
रोचनार्था फलश्रुतिः ।।

कर्माबद्दल आवड निर्माण व्हावी, तिकडे प्रवृत्ती वाढावी याकरता वेदांनी फलश्रुतीही सांगितलेली आहे. ते प्राधान्य नाहीये. ज्याप्रमाणे फळबोधक अशी वाक्यं आहेत तशीच

***
पान ५१२

आत्मज्ञानरूपी फल सांगणारीही वाक्यं आहेत.

तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिषन्ति यज्ञेन, दानेन, तपसा अनाशकेन ।

स्वर्गादिफलजनकही यज्ञादिकर्म आहे त्याचप्रमाणे आत्मज्ञानजनकही आहे हे स्वतंत्र, वेदांनी सांगितलेलं आहे. आणि तशी ज्याला तीव्र इच्छा झाली त्याला मात्र

रोचनार्था फलश्रुतिः

हे पटतंय. कारण त्याला फळाची इच्छाच नाहीये. अशा रितीने जर फळाची इच्छा सोडून कर्म घडलं तर त्या कर्माचं फळ आत्मज्ञान हे आहे. आपला हृदयग्रंथी तुटावा अशी ज्याला इच्छा आहे त्याने यथाविधी भगवंताचं अर्चन करावं. वेदद्वारा असो, तंत्रद्वारा असो, आचार्यांकडून सर्व मार्गदर्शन मिळवून आपल्याला जी इष्टमूर्ती असेल त्याठिकाणी भगवंताची पूजा करावी. पूजा करताना मूर्तीसमोर बसावं. प्राणायामादिकांनी इंद्रियशुद्धी, शरीरशुद्धी करून घ्यावी. मूर्तीच्या ठिकाणी आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी न्यास करून, जेवढे उपचार मिळाले असतील त्यानी पूजा करावी. पाद्य आहे, अर्घ्य आहे, आचमन आहे, स्नान आहे अनेक उपचार आहेत. पंचोपचार आहेत, षोडशोपचार आहेत. चतुःषष्टी उपचारही आहेत म्हणतात. वस्त्र, अलंकार, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे सगळेही भगवंताला मूर्तीच्या ठिकाणी कल्पून अर्पण करावेत. प्रार्थना करावी, स्तुती करावी आणि प्रणाम करावा. पूजा करताना आपण तन्मय झालं पाहिजे. म्हणजे अर्चनभक्तीच्या वेळेलासुद्धा हा ग्रंथी कमी झालेला असला पाहिजे. त्याशिवाय खरं अर्चन होणार नाही. पूर्ण ग्रंथीभेद होणं हे पुढचं कार्य आहे.

आत्मानं तन्मयं ध्यायन् मूर्तिं सम्पूजयेद्धरेः ।।
11.3.54 ।। श्री. भा.

थोडा जरी अहंकारग्रंथीचा तिरोभाव झाला तर ते अर्चन होतं. याचप्रमाणे अग्नीमध्ये, सूर्यमंडळामध्ये, जलामध्ये, अतिथीच्या ठिकाणी किंवा मनामध्ये भगवंताचं अर्चन करणारा जो आहे तो मुक्त होतो.

अचिरान्मुच्यते हि सः ।।
11.3.55 ।। श्री. भा.

भगवान श्रीहरींनी कोणती कोणती कर्म केली हे मला सांगा म्हणून राजा विचारतोय. कोणती रूपं धारण केली, कोणते अवतार धारण केले आणि कोणती कर्म केली हे सांगा. द्रुमिल ऋषी सांगताहेत, "देवाजी कर्म, देवाचे अवतार सगळे सांगणं हे शक्य आहे का बाबा. अनंत गुण त्याचे आहेत. अनंत गुण प्रतिपादन करायला प्रवृत्त होणं म्हणजे तो बालबुद्धीचा असला पाहिजे,

***
पान ५१३

शक्य नाहीये ते. कळून घेऊन प्रवृत्त झालं पाहिजे. यथामती शुक्राचार्य महाराजांनीसुद्धा परीक्षित राजाने भागवत श्रवणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर, 'माझ्या वाणीला भगवंताने प्रेरणा करावी आणि माझ्याकडून त्याचं हे दिव्य चरित्र वदवून घ्यावं' अशी प्रार्थना करूनच सुरुवात केली. भूमीवर असलेले रजःकण एकवेळ मोजता येईल. कुणाला मोजण्याची इच्छा झाली तर, कारण जिज्ञासा कोणती होईल हे सांगता येत नाही. सध्या प्रसिद्धी पुष्कळ आहे. कर्म उत्तम करतात.

भूतैर्यदा पञ्चभिरात्मसृष्टैः ।

पंचभूतांच्या द्वाराने हे विराट विश्व भगवंताने निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये प्रवेश केला. त्या नारायणालाच "पुरी शेते" पुरुष हे नाव उत्पन्न झालं. त्यालाच विराट, वैश्वानर असंही म्हणतात. संपूर्ण त्रिभुवन हे त्याचं शरीर आहे. त्याची इंद्रियं म्हणजेच सर्वांची इंद्रियं आहेत. ज्ञानेंद्रियं, कर्मेंद्रियं ही त्याचीच इंद्रियं आहेत. हा सृष्टी, स्थिती, प्रलय करणारा आदिकर्ता नारायण आहे. अगोदर त्यांच्याच संकल्पाने ब्रह्मदेव उत्पन्न झाले, उत्पत्ती करण्याकरता. संरक्षणाकरता विष्णुरूप धारण केलं आणि संहाराकरता तमःप्रधान असं रुद्ररूप धारण केलं. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती, लय हे अखंड चालू आहे. दक्षकन्या मूर्तीच्या ठिकाणी धर्मापासून नर, नारायण ही दोन रूपं भगवंताने धारण केली. नरनारायणांनी नैष्कर्म्यसिद्धीचा उपदेश केलेला आहे. अनेक ऋषीमंडळी त्यांची सेवा करताहेत. अद्यापि बद्रिकाश्रमात ते आहेत. त्यांची तपश्चर्या चालू असताना स्वर्गाचा राजा इंद्र याच्या मनात भीती उत्पन्न झाली.

पुरं विराजं विरचय्य तस्मिन् ।
स्वांशेन विष्टः पुरुषाभिधानं
अवाप नारायण आदिदेवः ।।
11.4.3 ।। श्री. भा.
मम धाम जिघृक्षतीति ।।
11.4.7 ।। श्री. भा.
***
पान ५१४

इंद्राला वाटलं हे ऋषी तपश्चर्येने माझं स्थान घेण्याची इच्छा करताहेत काय? हे विश्व नाहीच आहे अशी ज्यांची धारणा आहे, आत्मानंदात जे मग्न आहेत त्यांना काय इच्छा असणार? पण या देवराजाला आपल्या संस्काराप्रमाणे त्यांचीही बुद्धी तशीच असेल असं वाटलं. मग काय करायचं? त्यांची तपश्चर्या बंद पाडायची. मदनाला त्याच्या परिवारासह बद्रिकाश्रमात जाऊन नरनारायणांची तपश्चर्या बंद पाडायला सांगितली. तो मदन सगळ्या अप्सरांना घेऊन आलेला आहे. सर्व अप्सरांचं नृत्यगायन चाललेलं आहे. पण नरनारायणांच्या मनावर काहीही परिणाम नाही. देवेंद्राने हे विघ्न उत्पन्न केलेलं आहे त्याचंही काही नाही. भगवान शंकर असते म्हणजे समजलं असतं, लगेच त्यांनी तृतीय नेत्र उघडून त्या मदनाला जाळूनच टाकलं असतं. इथं ते नाही.

प्राह प्रहस्य गतविस्मय एजमानान् ।।
11.4.8 ।। श्री. भा.

आपल्या शक्तीने हा तपोभंग करायचा असं इंद्राने ठरवलं पण त्याची शक्ती आहे किती? असे अनेक इंद्र ज्यांनी नेमलेले आहेत त्यांना हा इंद्र काय करणार? त्यामुळे क्रोध नाहीये. मदनालाच भीती वाटायला लागली. नारायण म्हणाले, ""भिऊ नका. तुम्ही आमचे अतिथी आहात. तुमचा सत्कार करायला पाहिजे.'' अभय दिलं. मदनालाच लज्जा उत्पन्न झाली, तो प्रार्थना करतोय,

त्वां सेवतां सुरकृता बहवोऽन्तरायाः
स्वाौको विलङ्घ्य परमं व्रजतां पदं ते ।
नान्यस्य बर्हिषि बलीन् ददतः स्वभागान्
धत्ते पदं त्वमविता यदि विघ्नमूर्ध्नि ।।
11.4.10 ।। श्री. भा.

कबूल केलं. नारायणा, आपली सेवा करणारे, आपले भक्त जे आहेत त्यांना आम्ही देव विघ्न उत्पन्न करतो. कारण आम्हाला असं वाटतं, की आमच्याही वरती हे जाणार. आमच्यापेक्षा उच्च गतीला ते जाणार, तसं त्यांना जाऊ द्यायचं नाही म्हणून आम्ही त्यांना विघ्नं उत्पन्न करतो. यज्ञ करून आमची पूजा करणारे, आम्हाला हविर्भाग देणारे जे कर्मनिष्ठ लोक आहेत त्यांना आम्ही त्रास देत नाही. पण तुमचे भक्त असे असतात की या विघ्नांच्या डोक्यावर पाऊल ठेवून आपल्याजवळ येऊन ते पोचतात. "त्वमविता यदि' आपली कृपादृष्टी त्यांच्यावर असते. तपश्चर्या पुष्कळ मंडळी करतात. क्षुधा नाही, तृषा नाही, वारा, थंडी सगळं सहन करतात. हे सगळं करून कोणी मनाविरुद्ध वागल्यावर,

क्रोधस्य यान्ति विफलस्य वशं पदे गोः ।।
***
पान ५१५
म्लान्ति दुस्तरतपश्च वृथोत्सृजन्ति ।।
11.4.11 ।। श्री. भा.

एकदम राग निर्माण होतो त्यांना. अनेक तपस्वी पुष्कळ तपश्चर्या करूनसुद्धा क्रोधाच्या आधीन झाल्यामुळे त्या तपाचा नाश होतो. पण आज आपल्याला आम्ही शरण आलेलो आहोत. आपल्याला क्रोध नाही, कोणताही विकार नाही. ज्ञानी महात्म्यांचं दर्शन झालं की निर्विकार आत्मस्वरूप कसं असतं हे पाहायला मिळतं. दिसणारे सर्वही भावपदार्थ जायते, अस्ति, विरणमते, अपक्षीयते, विनश्यति या सगळ्या विकारांनी व्याप्त आहेत आणि निर्विकार आत्मस्वरूप आहे हे कसं शक्य आहे? आत्मस्वरूप आहे हे देखील वाटत नाही, या सर्व भावविकारांकडे पाहून पण अशा ज्ञानी महात्म्यांचं दर्शन झालं की ते पटतंय.

तस्मिन्‌स्तज्जना भेदाभावात् ।। नारदभक्तिसूत्र

हाही सिद्धांत सांगितला आहे भक्तिशास्त्रकारांनी. भेद नाहीच आहे. असा निर्विकार ज्ञानी महात्मा तोच परमात्मा आहे. मदनादिकांना अत्यंत लाज वाटलेली आहे. आम्ही यांच्याजवळ जाऊ शकत नाही. यांच्याजवळ जाऊ इच्छिणाऱ्यांचे पाय ओढायचे एवढंच आम्ही करतो म्हणाले. नारायणांनी हे सर्व ऐकून घेतले.

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ।।
12.19 ।। भ. गी.

हे सगळेही परमात्मस्वरूपाचे गुण आहेत. स्थितप्रज्ञाचे गुण, भगवद्भक्ताचे गुण, गुणातीताचे गुण हे सगळेही परमात्मस्वरूप प्रदर्शन करणारे आहेत. नारायणांच्या संकल्पाने दिव्य अप्सरा निर्माण झालेल्या आहेत. स्वर्गातून मदनाबरोबर आलेल्या अप्सरांपेक्षा दिव्य अशा अप्सरा तिथे निर्माण झाल्या. मदनादिक सर्व अप्सरा तो चमत्कार पाहून मोहित झालेले आहेत. हसले भगवान नारायण. म्हणाले, ""तुम्ही आमचे अतिथी आहात.

आसां एकतमां वृणीध्वम् ।।
11.4.14 ।। श्री. भा.

यापैकी एखादी अप्सरा तुम्हाला स्वर्गात घेऊन जायची असेल तर घ्या.'' त्याप्रमाणे उर्वशी नावाच्या श्रेष्ठ अप्सरेला घेऊन मदनादिक लोक स्वर्गलोकात निघून गेलेले आहेत. मोहात टाकणाऱ्या अनेक अप्सरा जे निर्माण करू शकतात किंवा जे तपःस्वरूप होऊ शकतात त्यांना त्या अप्सरांचा मोह कसा पडेल?

अग्नीच्या ज्वाळा अग्नीला काही करू शकत नाहीत, दुसऱ्याचा दाह करतील. स्वर्गलोकामध्ये

***
पान ५१६

येऊन मदन इंद्राला सांगतोय,

ऊचुर्नारायणबलं शक्रस्तत्रास विस्मितः ।।
11.4.16 ।। श्री. भा.

नारायणांना मोह उत्पन्न होणं शक्य नाही, देवराज. इंद्रालाही विस्मय वाटला. नारायण अवताराचं थोडक्यात चरित्र सांगितलं योगीद्रांनी.

हंसरूप भगवंताने धारण केलेलं आहे आणि आत्मयोग त्यांनी सांगितला. दत्तात्रेयरूप आहे, कुमार आहे, ऋषभदेव आहे. ही सगळी त्या भगवंताचीच स्वरूपं आहेत. प्रलयाच्यावेळेला मनुराजाचं रक्षण करण्याकरता भगवान मत्स्यरूप झालेले आहेत. हिरण्याक्षाचा वध करण्याकरता, पृथ्वीचा उद्धार करण्याकरता भगवान वराहरूप झाले. कूर्मावतार धारण केला. मंदराद्री पर्वत धारण केलेला आहे. गजेंद्राला मगरीपासून श्रीहरींनी मुक्त केलेलं आहे. समुद्रात पडलेले जे सर्व ऋषी आहेत वालखिल्य ऋषी, यांचाही उद्धार केलेला आहे. वृत्रासुराचा वध केल्यामुळे ब्रह्महत्येच्या दोषात सापडलेल्या देवेंद्रालाही मुक्त केलेलं आहे. देवस्त्रिया असुरांच्या कारागृहात नेल्या होत्या. अनाथ झाल्या, त्या दैत्याचा नाश करून देवस्त्रियांचं रक्षणही भगवंताने केलं आहे. अशी अनेक रूपं भगवंतानी धारण केली. परशुराम रूप घेऊन एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. रामावतार घेऊन रावण-कुंभकर्णांचा नाश करून देवांना सुखी केलेलं आहे. आणि पुढं ते भगवान यदुकुलामध्ये जन्म घेणार आहेत आणि अलौकिक कर्म करणार आहेत. पुढचं सांगताहेत. त्यावेळी अजून कृष्णावतार व्हायचा होता. वादविवादाने यज्ञकर्माकडे प्रवृत्त झालेल्यांचा बुद्धिभेद करणार आहेत. मोहामध्ये टाकणार आहेत.

संमोहाय सुरद्विषाम् ।।

हा हेतू आहे बुद्धावताराचा आणि कलियुगाच्या शेवटी कल्किस्वरूप धारण करून दुष्ट राजांचा संहार ते करणार आहेत आणि पुन्हा धर्माची प्रवृत्ती करणार आहेत. असे भगवंताचे अनेक अवतार आहेत राजा, आणि कर्मही अनेक आहेत. राजाने प्रश्न केला, महाराज,

भगवन्तं हरिं प्रायो न भजन्ति आत्मवित्तमाः ।
तेषां अशान्तकामानां का निष्ठा अविजितात्मनाम् ।।
11.5.1 ।। श्री. भा.

भगवंताच्या भजनापासून बहुतेक जे दूर राहिलेले आहेत. त्यामुळे इंद्रियांवर ताबा नाही, वासनाक्षय नाही अशा लोकांना काय फळ मिळतं? चमस् ऋषी सांगताहेत, भगवंताच्या मुखापासून,

***
पान ५१७

बाहूपासून, उरूपासून, पायापासून चार वर्ण निर्माण झाले, चार आश्रमही निर्माण झाले. म्हणजे सर्वांचा जनक परमात्मा आहे. आपल्या सर्वांना ज्याने निर्माण केलं त्यालाच विसरून जाणं म्हणजे केवढी कृतघ्नता आहे. आणि त्या दोषामुळे त्यांचा अधःपात होतो. हरिकथाश्रवणाकडे लक्ष नाही. भगवंताचं संकीर्तन नाही. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना बोध करून इकडे वळवलं पाहिजे. मोहामध्ये ते पडलेले आहेत. रजोगुण त्यांचा वाढलेला आहे. ते दांभिक बनलेले आहेत. भगवद्भक्तांचा उपहास ते करतात. विषयाच्या ठिकाणी त्यांचं चित्त आसक्त झालेलं आहे. श्रेष्ठ भक्तांचा अवमान ते करतात. सर्वठिकाणी परमात्मस्वरूप आहे असं वेद सांगताहेत पण तिकडे यांचं लक्ष जात नाही. यज्ञकर्म करायची, स्वर्गादि सुख मिळवायचं, तिथे दिव्य विषयभोग घ्यायचे हीच त्यांची विचारसरणी आहे. स्त्रीसंभोग, मद्यसेवन, मांससेवन हे वेदांमध्ये आहे परंतु तो परिसंख्या विधी आहे. हा अपूर्व विधी नाही म्हणतात.

म्हणजे इतरवेळी संभोग नकोय. हेच तात्पर्य आहे. मद्यमांस वगैरे जे यज्ञामध्ये असेल ते सुद्धा निवृत्तीकरता आहे. यज्ञ करणारे लोक मद्य, मांस घेतात असा एक आक्षेप आहे. रामशास्त्री एकदा म्हणाले होते, "आमचे लोक मद्यमांस सोडून जेवढे राहातात तितके तुमचे लोक कुठे राहातात? यज्ञात जेवढे विधीला आवश्यक असेल तेवढेच ते घेतात, इतर वेळी ते निवृत्त असतात.' तेव्हा तो अपूर्व विधी नाहीये. वेदांनाही निवृत्ती हीच इष्ट आहे.

धनं च धर्मैकफलं यतो वै
ज्ञानं सविज्ञानमनुप्रशान्ति ।
गृहेषु युंजन्ति कलेवरस्य
मृत्युं न पश्यन्ति दुरंतवीर्यम् ।।
11.5.12 ।। श्री. भा.

धर्माचं फळ हे धन आहे असं समजतात. वस्तुतः धर्मामुळे ज्ञान विज्ञान प्राप्त होत असताना धर्माचं फळ धन आहे अशी यांची दृष्टी आहे. ऐश्वर्य मिळालं पाहिजे. त्याकरता पुण्यकर्म करायला पाहिजे. त्यामुळे या संसारामध्ये आसक्त होऊन राहातात. मृत्यू जवळ आलेला आहे, त्याचा प्रतिकार कधीही करता येत नाही. इकडे त्यांचं लक्ष नाहीये. अशाप्रकारे अभिमान धारण करणारे जे आहेत त्यांना हरी हा सर्वत्र आहे ही भावना नाहीये. दुसऱ्यांचा द्वेष म्हणजे हरीचाच द्वेष ते करताहेत. असे जे आहेत, आसक्त चित्त झालेले, त्यांचा अधःपात होतो. कैवल्य तर मिळतंच नाही त्यांना. वेदांनी सांगितलेल्या त्रिगुणात्मक कर्माचंमच आचरण ते करताहेत. आयास सारखा चाललेला

***
पान ५१८

आहे. स्वर्गलोकात जातात, ते पुण्य संपलं की पुन्हा मृत्युलोकात येतात. पुन्हा कर्म करतात असं सारखं चाललेलं आहे. वासुदेवाला पराङ्मुख झालेल्या लोकांना हे फळ मिळतं. म्हणजे शास्त्रश्रद्धा आहे पण अभिनिवेशही आहे, जास्तीत जास्त कर्म केली की जास्तीत जास्त विषयभोग मिळेल, ऐश्वर्य मिळेल. म्हणजे खरी शास्त्रश्रद्धा नाहीये. वासुदेवांच्या भक्तीकडे प्रवृत्ती नाही. धर्मराजानेही अनेक यज्ञ केले पण ते सर्व ईश्वरार्पण बुद्धीने केले.

निमिराजांनी पुढचा प्रश्न विचारला, ""चारी युगामध्ये भगवंतांनी कोणती कोणती रूपं धारण केली? करभाजन ऋषी सांगताहेत, "कृतयुगामध्ये शुक्लवर्ण, चतुर्बाहु, जटाधारी, वल्कल धारण करणारे भगवान आहेत. आणि त्या युगामधले जीव हे शांत आहेत, निर्वैर आहेत. तपश्चर्या हेच त्यांचं यजन आहे.

यजन्ति तपसा देवं शमेन च दमेन च ।।
11.5.22 ।। श्री. भा.

तप म्हणजे आलोचना करणं. चिंतन करणं आत्मस्वरूपाचं. हीच त्यांची तपश्चर्या आहे. हंस, सुपर्ण, वैकुंठ, योगेश्वर अशी अनेक नावं त्यावेळेला भगवंताने घेतली. त्रेतायुगामध्ये रक्तवर्ण परमात्मा चतुर्बाहु, हिरण्याप्रमाणे त्याचे केस आहेत. त्यावेळची सर्वही मंडळी वेदांनी सांगितलेली यज्ञयागादिक कर्मे करीत असत. विष्णू, यज्ञ, पृश्निगर्भ अशी नावं भगवंताची त्यावेळी झालेली आहेत. भगवान रामचंद्रांचा अवतार याच युगात झालेला आहे. द्वापर युगामध्ये भगवान शामवर्ण आहेत. पीतांबरधारी आहेत. आणि सर्वही मंडळींचं वेद आणि तंत्र असं संमिश्र यजन त्यांचं चाललेलं आहे. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध अनेक नावानी भगवान प्रसिद्ध आहेत. कलियुगामध्ये भगवान कृष्णवर्ण असणार आहेत.

यज्ञैः संकीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः ।।
11.5.32 ।। श्री. भा.

या युगातली मंडळी प्रायः नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन करण्यामध्येच निमग्न आहेत. भगवान रामचंद्रांचं स्मरण करताहेत.

ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं
तीर्थास्पदं शिवविरंचिनुतं शरण्यम् ।
भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं
वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ।।
11.5.33 ।। श्री. भा.
***
पान ५१९

सर्वही अंतराय दूर करणारे आपले चरण आहेत. अभीष्ट देणारे आहेत. तीर्थस्वरूप आहेत. शिवजी ज्यांना नमन करताहेत. सर्व भक्तांच्या पीडा दूर करणारे आहेत. भवाब्धीच्या नौकारूप आहेत. अशा आपल्या चरणारविंदांना आम्ही नमस्कार करतो.

त्यक्त्वा सुदुस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मीं
धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम् ।
मायामृगं दयितयेप्सितमन्वधावद्
वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ।।
11.5.34 ।। श्री. भा.

लौकिक व्यवहारासारख्या दिसतात भगवंताच्या काही लीला. परंतु त्याच्यामध्येही काही हेतू आहे. आपल्या पित्याची आज्ञा म्हणून, त्यांची इच्छा जाणून भगवान रामचंद्र अरण्यामध्ये गेले. सीतेला सुवर्णमृगाची इच्छा झाली. "दयितया ईप्सितम्" ।।

म्हणताहेत योगीद्र. केवढी प्रिय आहे सीतादेवी. रामचंद्र अरण्यात निघालेले असताना तिने निकरून सांगितलं की माहेरीही जाणार नाही आणि सासरीही राहणार नाही. कोणत्याही सुखाची इच्छा न धरता अरण्यात आलेली सीता अत्यंत प्रिय आहे. तिला इच्छा झाली ती पूर्ण केली पाहिजे. म्हणून सुवर्णमृगाच्या पाठीमागे राम गेले. असा महापुरुष त्याच्या चरणांना आम्ही वंदन करतो.

असं ध्यान करतात कलियुगातली मंडळी आणि भगवंताचं ध्यान, पूजन करून ते मुक्त होताहेत.

खरे जे गुणज्ञ आहेत ते कलियुग चांगलं म्हणतात.

यत्र संकीर्तनेनैव सर्वः स्वार्थोऽभिलभ्यते ।।
11.5.36 ।। श्री. भा.

नामसंकीर्तनाने, गुणसंकीर्तनानेच सर्व इच्छा पूर्ण होताहेत. यासारखा लाभ नाही. भगवद्प्रेम अंतःकरणात निर्माण होणं हा मोठा लाभ आहे. त्यामुळे परमशांती प्राप्त होते. कृतयुगामध्ये जन्माला आलेल्या जीवांना वाटतं आपण कलियुगामध्ये जन्म घ्यावा म्हणजे नारायणाची भक्ती आपल्याला मिळेल. ताम्रपर्णी नदी आहे, कृतमाला, पयस्विनी, कावेरी अशा नद्यांच्या तीरावर राहून त्यांचं जलपान करणाऱ्यांच्या अंतःकरणात भक्ती निर्माण होते आहे. भगवद्भक्ताला देव, ऋषी, पितर, भूत, आप्त कुणाचंही ऋण नसतं. अनन्य भावाने भगवंताला जो शरण जातो तो सर्व ऋणातून मुक्त होतो. आपलं अनन्य भावाने भजन करणाऱ्याच्या चित्तात श्रीहरी प्रविष्ट होतात

***
पान ५२०

आणि सर्व दोष स्वच्छ धुवून टाकतात.

नारद सांगतात, वसुदेवा, याप्रमाणे त्या मिथिलाधिपती निमिराजाने त्या जयंतीपुत्र योगीद्रांकडून सर्व समजावून घेतलं. आनंद झाला. त्यांची पूजा केलेली आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे धर्माचरण करून उत्तम गती प्राप्त करून घेतली. तू ही वसुदेवा हे सर्व ऐकलंस. याप्रमाणे आचरण कर. संगत्याग कर म्हणजे तुला आत्मज्ञान प्राप्त होईल. वसुदेव-देवकी तुमच्या दोघांचं यश सर्व त्रैलोक्यात पसरलेलं आहे. भगवान वैकुंठपति तुमचे पुत्र होऊन तुमच्याजवळ राहाताहेत. रोज त्यांचं दर्शन होतं. प्रेमाने जवळ घेता, जेवण करता, भाषण करता, नेहमी जवळ आहे. त्या भगवंताच्या सान्निध्याने तुम्ही पवित्र झालेला आहात. पुत्रस्नेह जरी असला तरी तुम्ही पवित्र झालेला आहात. शिशुपाल, कंस, शाल्व वगैरे राजे विरोधी बुद्धी असताना भगवंताच्या ध्यानाने मुक्त झाले. मग तुमची तर बुद्धी अनुरक्त आहे. पण वसुदेवा हे लक्षात ठेव,

मा अपत्यबुद्धिमकृथाः कृष्णे सर्वात्मनीश्वरे ।
मायामनुष्यभावेन गूढैश्वर्ये परेऽव्यये ।।
11.5.49 ।। श्री. भा.

भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपला मुलगा आहे ही बुद्धी तू सोडून दे. फार अपराध होतो आहे. आपल्यासारखंच पांचभौतिक शरीर आहे म्हणून हा आपला मुलगा आहे, ही बुद्धी तू सोडून दे. भूभार झालेल्या अनेक दैत्यांचा नाश करावा आणि सुष्टांचं रक्षण करावं या हेतूने भगवान अवतार घेऊन आलेले आहेत. आणि आपलं यश त्यांनी सर्वत्र पसरलेलं आहे. हे वसुदेवाला बजावलं नारदांनी. वसुदेव देवकी दोघांनाही आनंद झालेला आहे. अशाप्रकारे हा संवाद जे ऐकतील, चिंतन करतील त्यांनासुद्धा आत्मज्ञानाची योग्यता प्राप्त होईल.

अथ ब्रह्मात्मजैर्देवैः प्रजेशैरावृतोऽभ्यगात् ।
भवश्च भूतभव्येशो ययौ भूतगणैर्वृतः ।।
11.6.1 ।। श्री. भा.

शुक्राचार्य सांगतात राजा, एके दिवशी द्वारकेमध्ये ब्रह्मादिक देव प्राप्त झाले भगवान श्रीकृष्णांना भेटण्याकरता. शंकरभगवान आहेत, इंद्रादिक देव आहेत. देवांनी स्तुती केली.

नताः स्म ते नाथ पदारविन्दं
बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभिः ।
यच्चिन्त्यते अन्तर्हृदि भावयुक्तैः
मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात् ।।
11.6.7 ।। श्री. भा.
« Previous | Table of Contents | Next »