आपल्या चरणाला आम्ही नमस्कार करीत आहोत. कर्मपाशातून मुक्त होण्याची इच्छा करणारे भगवद्भक्त ज्याचं चिंतन करतात. त्रिगुणात्मक मायाशक्तीने आपण हे जगत उत्पन्न करता, पालन करता पुन्हा त्याचा उपसंहार करता. असे पूर्ण शक्तिसंपन्न आपण आहात. आपल्या कृपेनेच सर्व भक्तांच्या कामना पूर्ण होतात. भक्त निष्काम होतात, मुक्त होतात. ब्रह्मदेव शेवटी म्हणताहेत, ""भूमीचा भार हलका करायला आपल्याला पूर्वी प्रार्थना केली होती. आपण त्याप्रमाणे अवतार धारण करून आला आणि सर्व कार्य केलेलं आहे. संतांच्या द्वाराने धर्मस्थापना केली. सर्व लोकांना शुद्ध करणारी आपली कीर्ती आपण प्रसृत केली. जी जी आपली चरित्रं याठिकाणी घडली, त्यांचं श्रवण करणारे, कथन करणारे कलियुगात तरून जातील. यदुवंशात अवतार धारण करून आपल्याला एकशे पंचवीस वर्षे झाली आहेत. देवांचं कार्यही झालेलं आहे. विप्रशापामुळे हे यदुकुलही नष्ट होईल. आपली इच्छा असेल तर आपण वैकुंठलोकामध्ये प्राप्त व्हा. आमच्याही लोकामध्ये जाताना येऊन चला.''
भगवान सांगताहेत, ""माझाही तसाच विचार आहे. हे यादवांचं कुल अद्यापि शिल्लक आहे. उगीच लोकांना त्रास होईल. त्याचा संहार करूनच यायला पाहिजे. ते कार्य झाल्यावर वैकुंठलोकाला जाताना मी आपल्या लोकामध्येही येऊन जाईन.'' ब्रह्मादिक देवांनी प्रणाम केला आणि ते आपापल्या स्थानाला निघून गेले.
द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन व्हायला लागले. वृद्ध मंडळी सगळी देवाकडे आली आणि विचारताहेत, ""काय आहे देवा हे? काय होणार आहे?'' भगवान सांगताहेत, ""ब्राह्मणांचा शाप आपल्या कुलाला झालेला आहे. आता इथे थांबून उपयोग नाही. द्वारका सोडून आपण सर्वजण प्रभासक्षेत्रामध्ये जाऊ या. तिथे आपण स्नान, दान, होम-हवन असं काही पुण्यकर्म करू. काहीतरी उपाय आपण केला पाहिजे.'' भगवंतांचा आदेश झाल्यावर सर्व यादवांनी निघण्याची तयारी सुरू केली.
श्रीकृष्णभगवंतांना भेटण्याकरता उद्धवजी मुद्दाम एकांतात आलेले आहेत. प्रणाम केला. उद्धवजी बोलू लागले. ""भगवन्, आपण या कुलाचा त्याग करून निघाला असं दिसतंय. विप्रशापाचा आपण काहीही प्रतिकार केला नाही. मी मात्र आपल्या चरणांना सोडून इथे राहणार नाही. मला आपल्याबरोबर घेऊन चला. आजपर्यंत आपल्या अनेक लीला मी पाहिलेल्या आहेत. आपलं सान्निध्य नेहमी मला मिळालं. आपला प्रसाद नेहमी मला मिळालेला आहे.''
अशी प्रार्थना उद्धवजींनी केल्यानंतर भगवंताने उद्धवजींना उपदेश करायला आरंभ केला.
यदात्थ मां महाभाग तच्चिकीर्षितमेव मे ।
ब्रह्मा भवो लोकपालाः स्ववासं मे अभिकांक्षिणः ।।
11.7.1 ।। श्री. भा.
होय बाबा, मला आता निजधामाला जायची इच्छा आहे. हे सगळे ब्रह्मादिक देव मला भेटून गेले आणि लवकर परत या अशी विनंती त्यांनी केली. माझं इथलं कार्य आता आटोपलेलं आहे. आता कशाला इथे राहायचं? या कुलाचा नाश होणार, ही द्वारका नगरी सातव्या दिवशी समुद्रात बुडून जाणार. आणि या कलीचा अधिकार याठिकाणी सुरू होणार आहे. तू आता इथे राहू नकोस. कलियुगामध्ये सर्वांची वृत्ती अधार्मिक होणार आहे. सर्व स्वजनांबद्दलची ममता, स्नेह ही टाकून देऊन माझं चिंतन करीत तू सर्वत्र संचार कर. जे जे दिसणारं आहे ते नश्वर आहे. मायिक आहे. मनोनिग्रह ज्यांचा झालेला नाही, त्यांना हा द्वैतभ्रम होतो. गुणदोष दृष्टी उत्पन्न होते. आत्मानुभव झाल्यामुळे अत्यंत संतुष्ट ज्याची वृत्ती आहे त्याला कोणताही प्रतिबंध नाही. सर्व भूतमात्रांबद्दल प्रेम धारण करणारा, सर्व विश्व हे माझंच स्वरूप आहे असं चिंतन करणारा जो आहे त्याला कोणतंही दुःख होत नाही. जा आता इथून निघून जा.''
मोठे भगवद्भक्त उद्धवजी, तत्वजिज्ञासू आहेत. काहीतरी मार्गदर्शन आपल्याला व्हावं अशी इच्छा त्यांना आहे. ते म्हणताहेत, ""भगवन् सगळ्यांना सोडून जायचं म्हणजे कठीण आहे. हा त्याग कसा करता येईल? विषयी लोकांच्या मनात अनेक जन्माच्या संस्कारांनी विषय घट्ट बसलेले आहेत त्याचा त्याग कसा करायचा? अहंता आणि ममता हे दोन दोष चित्तामध्ये आहेत. यातून मुक्त कसं व्हायचं याचा आपण उपदेश करा.
भगवंताने उपदेश करायला सुरवात केली.
उद्धवा, दुसऱ्याने उपदेश करण्याचं काय कारण आहे? खरे जे विवेकसंपन्न महात्मे आहेत ते आपला उद्धार आपणच करून घेतात. आपला गुरू आपण आहे. मनुष्याला जी बुद्धी मिळालेली आहे, प्रत्यक्ष आहे अनुमान आहे. या सगळ्या प्रमाणांच्या द्वाराने जे काही समजून घ्यायचं ते समजून घेतात हे महात्मे. मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर मी सर्वत्र कसा व्यापून राहिलेलो आहे हे ते पाहू शकतात. अनेक प्रकारची शरीरं आहेत. त्यापैकी मानव शरीर हे मला प्रिय आहे. या मानव शरीरामध्येच माझा शोध करायला अवसर आहे. जगातलं काय घ्यावं आणि काय सोडावं हे समजलं पाहिजे. हेयोपादेय विवेक जो आहे तो भगवान सांगताहेत. अवधूत आणि यदुराजा यांचा एक पूर्वी संवाद झालेला आहे तो तुला सांगतो.
अवधूत दत्तात्रेय हे कावेरी नदीच्या तीरावर झाडाखाली स्वस्थ पडून राहिलेले आहेत. यदुराजा पृथ्वीवर संचार करत निघाला होता. आपल्या कनिष्ठ बंधूला सार्वभौम केलं आपल्या बापाने आणि मला त्याच्या हाताखाली ठेवलं, हे त्याच्या मनाला मोठं दुःख होतं. अवधूतांचं दर्शन झाल्यावर त्याला वाटलं की हा मोठा महात्मा आहे. त्याने विचारलं, ""महाराज,
कुतो बुद्धिरियं ब्रह्मन् अकर्तुः सुविशारदा ।
यां आसाद्य भवाँल्लोकं विद्वांश्चरति बालवत् ।।
11.7.26 ।। श्री. भा.
ही आपली बुद्धी इतकी शांत, स्थिर कशी झाली? काहीही आपण करत नाही आहात. व्यावहारिक प्रयत्न नाही, पारमार्थिक प्रयत्न नाही. लहान मुलाप्रमाणे निर्विकार वृत्तीने आपण संचार करता. धर्म, अर्थ, काम याच्याकरता सर्व मानव प्रयत्न करतात. आयुष्य पाहिजे, संपत्ती पाहिजे, कीर्ती पाहिजे. सर्व लोक असे प्रयत्नात असताना आपण काहीही करत नाही याचं कारण काय? सर्व लोक या कामक्रोधरूपी अग्निमध्ये दग्ध होताहेत. त्यांच्या मनाला समाधान, शांतता लाभत नाही. पण आपल्याला कोणताही विकार नाहीये. इतका पूर्ण आनंद आपल्याला कसा मिळाला? हे मला सांगा.
ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः ।।
11.7.30 ।। श्री. भा.
सुखसाधन समजलेले कोणतेही विषय आपल्यापाशी नाहीत. राहायला जागा नाही, वस्त्र नाही, अन्न नाही, मानसन्मान नाही. असं असताना आपण आनंदी कसे आहात? हा आनंद कुठून मिळवला आपण?''
अवधूत म्हणताहेत, ""राजा, तू चांगले प्रश्न विचारलेस. हा आनंद मिळवण्याकरता मी अनेक गुरू केलेले आहेत. दोष टाकण्याकरताही गुरू आणि गुण ग्रहणाकरताही गुरू केले. त्याप्रमाणे मी शिकलेलो आहे.
पहिला गुरू म्हणजे ही पृथ्वी आहे.
भूतैः आक्रम्यमाणो अपि धीरो दैववशानुगैः ।
तद् विद्वांन चलेनमार्गात् अन्वशिक्ष्ं क्षितोर्व्रतम् ।।
11.7.37 ।। श्री. भा.
भूमीपासून मी तितिक्षा शिकलो. "सर्वसहा' तिला म्हणतात. ती शांत आहे. लोक तिला खणतात, अग्नीने जाळतात, मल-मूत्र विसर्जन करतात तरी ती क्षमाशील आहे. सर्व सहन करते. ज्याला आपली उन्नती करून घ्यायची आहे त्याने या भूमीप्रमाणे तितिक्षु झालं पाहिजे. भूमीचा...
...भाग म्हणजे पर्वत, वृक्ष. यांच्याजवळ किती फळं, पुष्प आहेत परंतु हे सर्व दुसऱ्याकरता आहे. स्वतः काही त्याचा भोग ते घेत नाहीत. हे मी या पृथ्वीपासून शिकलेलो आहे.
दुसरा गुरू वायू आहे. प्राणवृत्ती संपादन केली पाहिजे. प्राणवायू कसा आहे. सर्व इंद्रियांपेक्षा, ज्ञानेंद्रियं, कर्मेंद्रियं यांच्यापेक्षा प्राणवायू श्रेष्ठ आहे. डोळे, कान, नाक वगैरे इंद्रिये चोवीस तास काम करू शकत नाहीत. त्यांना विश्रांती पाहिजे. प्राणवायूचं काम चोवीस तास चाललेलं आहे. तो कधीही थांबत नाही. हा एक मोठेपणा आहे. आणि दुसरा म्हणजे त्याला आहार काहीही चालतो. जेवण मिळालं तर ठीक, दूध मिळालं तरी ठीक, लिंबाचा रस मिळो अथवा पाणी मिळो प्राणवायू राहू शकतो. सर्व इंद्रियं ही ज्याच्या आधाराने राहतात त्याला आहारातबद्दल कसलीही आसक्ती नाही. जे मिळेल त्याच्यावर तो काम करतो आहे. ही वृत्ती प्राप्त झाली पाहिजे. मी मोठा आहे, सर्व माझ्यावर अवलंबून आहे ही भावना झाली की संपलं, उन्नती थांबली. हे मी प्राणवायूपसून शिकलो. बाह्यवायू हा सर्व ठिकाणी वाहतो आहे. फुलांच्या बागेतून जाईल, स्मशानातून जाईल पण काहीही संबंध नाहीये. असंग तो असतो. ही वृत्ती बाह्य वायूपसून मी शिकलेलो आहे.
तिसरा गुरू आकाश आहे. आकाश जसं सर्वव्यापी आहे तसा मी सुद्धा सर्वव्यापी आहे. आकाश सर्वत्र असून असंग आहे. पाऊस पुष्कळ पडला तरी आकाश भिजत नाही किंवा ते वाळण्याची वाट पहावी लागत नाही. हे शिक्षण मी आकाशापासून घेतलं.
चौथा गुरू जल आहे. जल हे सर्वांना समाधान करणारं आहे. मधुर आहे. तीर्थजल तर पवित्र करणारं आहे. पापक्षय करणारं आहे. त्याप्रमाणे आपल्या सान्निध्याने सर्वांची पापं दूर करण्याची शक्ती मिळवली पाहिजे. हे जलापासून मी शिकलो.
पाचवा गुरू अग्नि म्हणजे तेज आहे. अग्नीमध्ये काहीही टाकलं ओलं, वाळलेलं, चांगलं, वाईट ते सगळं तो दग्ध करतो आणि पुन्हा तेजस्वी राहतो. तसं पापपुण्याचा कुठलाही प्रसंग आला तरी साधकाने आपल्या तपःतेजाने तेजस्वी राहिलं पाहिजे.
सहावा गुरू चंद्र आहे. चंद्राच्या एक एक कला कमी होत जातात, पुन्हा वाढतात पण मूळ चंद्रस्वरूप तसंच राहतं. तसं देह हा विकारी आहे. पण मूळस्वरूप जो आत्मा तो कायम आहे, अविकारी आहे.
सातवा गुरू सूर्य आहे. सूर्य आपल्या सूर्यकिरणांनी उन्हाळ्यात नद्यांचं पाणी शोषून घेतो.
आणि पावसाळ्यात मेघांच्या रूपाने ते जल परत देतो. हा जो त्याग आहे तो सूर्यापासून मी शिकलो. संग्रह केला तरी तो त्यागाकरता आहे. संग्रह करू नये असा सध्या वाद निर्माण झालेला आहे. तो ही आता बरोबर नाही असं आता वाटायला लागलंय. दुसरा एक गुरू संग्रह उदाहरणाकरता एक पक्षी आहे. त्या पक्षाला मांसाचा गोळा मिळाला आणि तो चोचीमध्ये धरून तो आकाशातून निघालेला असताना ज्यांना मांस मिळालं नाही ते पाच पन्नास पक्षी त्याच्या अंगावर धावून गेले. सगळे त्याला त्रास देऊ लागल्यावर त्याने तो मांसाचा गोळा टाकून दिला. त्याबरोबर सगळे पक्षी तिकडे गेले आणि हा वाचला. याचा अर्थ असा आहे की त्या पक्षाने संग्रह केला पण तो फक्त स्वतःकरता केला. संग्रह हा दोष नाही. अर्थसंग्रह अवश्य झाला पाहिजे. वैश्यांचा गुणधर्म सांगताना शास्त्रकार सांगताहेत की कितीही द्रव्य मिळवलं तरी ज्यांच्या मनाचं समाधान होत नाही तो खरा वैश्य आहे. त्याशिवाय अर्थार्जन कसं होणार? त्याला, समाजाला, राष्ट्राला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे ना. पण संग्रह करताना जर हे फक्त माझं आहे. मी प्रयत्न केलेला आहे यात कुणाचाही संबंध नाही अशी जर बुद्धी असेल तर ती वाईट आहे. एकेकवेळा तर स्वतःही भोग घ्यायचा नाही, दुसऱ्यालाही द्यायचं नाही, फक्त संग्रह करायचा. अशी बुद्धी असेल तर असा संग्रह हा दोष आहे.
संसारामध्ये आसक्ती, ममता वाढली असेल तर काय दोष होतो ते सांगतो.
नातिस्नेहः प्रसङ्गो वा कर्तव्यः क्वपि केनचित् ।।
11.7.52 ।। श्री. भा.
अतिशय ममता, हे माझं आहे ही आसक्ती माणसाने ठेवू नये म्हणून एक गोष्ट सांगतो. एक कपोत पक्षी आणि त्याची स्त्री दोघेही अरण्यामध्ये झाडावर राहत होते. दोघांचं प्रेम होतं. अरण्यामध्ये विहार करावा, परत आपल्या स्थानात यावं असा त्यांचा काल चाललेला आहे. त्या पक्षिणीला मुलं झाली. त्या मुलांना घरट्यात ठेवून एके दिवशी ते दोघे धान्य वगैरे आणायला बाहेर पडले. इकडे एका पारध्याने जाळं लावलं त्या झाडाखाली. ती पक्षाची पिल्लू धान्याच्या लोभाने खाली उतरली आणि त्या जाळ्यात सापडली. हे दोघे आले परत आणि ती पक्षिणी त्या पिलांना जाळ्यात अडकलेलं पाहिल्याबरोबर दुःखित झाली. प्रेम आहे. परमेश्वराच्या मायेचा मोह आहे. माझी मुलं म्हणून ती त्यांना सोडवायला गेली आणि ती ही त्या जाळ्यात अडकलेली आहे. हा कपोत पक्षी झाडावर बसून दुःख करतो आहे. माझी स्त्री ही गेली आणि मुलंही गेली. माझी मुलं, माझी स्त्री या ममतेने तो त्यांना सोडवायला गेला आणि तोही त्या जाळ्यात सापडलेला आहे. त्या पारध्याचं...
काम सोपं झालं. एकदम सगळे पक्षी त्याला मिळाले. याप्रमाणे गृहस्थाश्रमी मनुष्य जो आहे त्याची त्या पक्षाप्रमाणे अवस्था होते. ममतेमध्ये अडकून त्याचा विनाश होतो.
अवधूत सांगतात, राजा, अजगराला मी गुरू केलेलं आहे. इंद्रिय संयोगामुळे प्राप्त होणारं सुख जे आहे ते स्वर्गामध्ये, नरकामध्ये, पृथ्वीवर सारखंच आहे. सुखाची इच्छा करून जो प्रयत्न माणसाचा चाललेला आहे, तो बरोबर नाही. म्हणजे प्रयत्नाशिवाय सुख मिळेल? हो, असा सिद्धांत आहे. त्याला त्यांनी तर्क दिलेला आहे. दुःखाकरता कोणी प्रयत्न करतं का? दवाखान्यात जाऊन डॉक्टर मला उद्या ताप येण्याचं औषध द्या असं म्हणतो का आपण? पण येतो ना ताप? डॉक्टर जर ताप येण्याचं औषध द्यायला लागला तर त्याचा दवाखाना बंद होईल. तेव्हा दुःख हे प्रयत्न न करता का मिळतं हा त्यांचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे सुखही मिळणं शक्य आहे. पूर्वीचं जे काही कर्म असेल त्यायोगाने सुख मिळू शकेल. दुःख मिळतं ना काही प्रयत्न न करता? पूर्वकर्माचं ते फल आहे. त्याचप्रमाणे पूर्वकर्माचं फल म्हणून सुखही मिळणं शक्य आहे. पण तेवढं धैर्य पाहिजे. ते धैर्य असत नाही. बसून राहिलं तर कसं होईल? प्रयत्न नाही केला तर कसं होईल? हा एक विषय सांगितला. आणि जो मिळेल आपल्याला ते घेऊन त्यामध्ये संतोषाने राहणे. हा सगळा उपदेश साधकाकरता आहे. अजगर हा एका जागी पडून राहतो नुसता. जवळ कुणी आलं पशु, पक्षी, मनुष्य तर भक्षण करतो नाहीतर निराहार पडून राहतो. ही अजगरवृत्ती म्हणजे दैववृत्ती आहे. पूर्वीचं माझं कर्म जर चांगलं झालेलं असेल तर मला सुख बसल्याजागी मिळालं पाहिजे. फार उच्चवृत्ती आहे ही. इतकं धैर्य सामान्य माणसांना असणं शक्य नाही. ह्या महात्म्यांनाच ते शक्य आहे.
त्याप्रमाणे गांभीर्य पाहिजे. एकदम उतावीळपणा नको. समुद्रापासून मी गांभीर्य शिकलो. पावसाळ्यात नद्या भरून येतात, समुद्राला पुष्कळ पाणी मिळतं पण समुद्र आपली मर्यादा सहसा कधी सोडत नाही. उन्हाळ्यामध्ये नद्या आटल्या, पाणी कमी आलं म्हणून समुद्र आटला, लांब गेला असंही होत नाही. समृद्धी आली तरी अहंकार नाही, गांभीर्य आहे आणि समृद्धी गेली तरी विषाद नाही, गांभीर्य आहे. हे भगवद्भक्तांनाच शक्य आहे.
रूपासक्ती आहे. स्त्रीचं सौंदर्य पाहून मनुष्याच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होते. पण ती उपयोगाची नाही. पतंग हा दिवा लागलेला पाहतो आणि त्याच्यावर झडप घालून नष्ट होतो. हे दोषत्यागाकरता पतंगाला गुरू केलेलं आहे. आसक्ती सोडण्यासाठी.
जे काही आपल्याला दिसतं आहे त्यातलं गुणग्रहण करण्याची वृत्ती पाहिजे. माधुकरी वृत्ती. मधुकर जो आहे तो प्रत्येक फुलापाशी जातो आणि त्याचा रस किंवा सार ग्रहण करतो. तसं अनेक शास्त्रं आहेत, अनेक विचार आहेत. त्यातील सार, प्रधानतत्व जे आहे ते त्या षट्पदाप्रमाणे, भ्रमराप्रमाणे कुठेही आसक्त न होता ग्रहण करण्याची वृत्ती पाहिजे.
संग्रहाची आसक्ती निर्माण झाली की दोष होतो. मधमाशी, हा एक गुरू केला. संध्याकाळी पुरलं पाहिजे, उद्याला पुरलं पाहिजे, महिनाभर पुरलं पाहिजे, जन्मभर पुरलं पाहिजे, संग्रह सुरू आहे. मधमाश्या सगळीकडे जाऊन मध आणतात आणि संग्रह करून ठेवतात. मधाने पोळं भरलेलं आहे. आपणही घेत नाहीत आणि दुसऱ्यालाही देत नाहीत. पण कोणीतरी येतो, त्यांना जाळून टाकतो आणि तो साठवलेला मध घेऊन जातो. अशी स्थिती होते नुसता संग्रह करण्याने, हा एक दोष सांगितला.
रसासक्ती ही ही मोठी भयंकर आहे. शब्दश्रवण करण्याची, गायन, वादन ऐकण्याची काहींना आवड असते. हरिण जो आहे तो गायन ऐकतो, श्रवण करतो आणि त्या व्याधाच्या आधीन होतो आहे. आपल्याला चांगलं चांगलं खायला मिळालं पाहिजे. ही ही रसासक्ती आहे. याकरता मीन म्हणजे माशाचं उदाहरण त्यांनी दिलंय. कोळ्याने जाळं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही खाण्याचा पदार्थ ठेवलेला आहे. तो मासा ते खाण्याकरता म्हणून जातो आणि गळाला सापडतो. रसाची आसक्ती जास्ती उत्पन्न झाली की अशी स्थिती होते. आहारत्याग केला की इंद्रियं ताब्यात येतात पण रसनेन्द्रिय ताब्यात येत नाही. ताप आल्यानंतर काही खाऊ नये असं वाटतं. ताप गेल्यानंतर हे खावं, ते खावं असं वाटतं. त्यावेळीच जपा म्हणतात. रसनेन्द्रिय आवरलं जाणं फार कठीण आहे. ""जितं सर्व जितो रसेण'' ज्याने रसनेन्द्रिय जिंकलं त्यालाच जितेंद्रिय म्हणतात.
मनामध्ये ज्या अनेक वासना आहेत, त्यामुळे काय दुःख होतं त्याबद्दल पिंगला वेश्येची कथा अवधूत सांगताहेत. हे फिरत असले पाहिजेत. जगाचं निरीक्षण करून आपला उद्धार आपल्याला करता येतो हे अवधूतांनी दाखवलेलं आहे. असा विचार जो करतो आहे त्याचा गुणग्रहण करणं. दोषत्याग करणं हा हेयोपादेय विवेक पूर्ण होतो आहे. ती पिंगला वेश्या रात्रीच्या वेळी आपल्या वाड्यामध्ये बसलेली आहे. कोणीतरी श्रीमंत मनुष्य येईल आणि आपल्याला द्रव्य मिळेल या आशेने ती वाट पाहती आहे. मध्यरात्र होऊन गेली तरी कुणी आलेलं नाही. झोप नाही. मग तिच्या...
मनामध्ये हा विचार उत्पन्न झाला.
न हि अङ्गा अजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति ।।
11.8.29 ।। श्री. भा.
काय मला मोह झाला म्हणाली. मला द्रव्य मिळेल या आशेने मी थांबले, झोप नाही आणि द्रव्यही नाही. हृदयस्थ जो आनंदरूप आत्माराम आहे त्याचा मी विचारही केला नाही. त्याला सोडून देऊन या बाह्यमोहामध्येच मी पडलेली आहे. त्या आशेमुळेच मी या दुःखामध्ये सापडलेली आहे. आत्मानंदाकडे आता माझं लक्ष गेलं तर बरं होईल. मला आता विरक्ती उत्पन्न झाली आहे ही ईश्वराची कृपा आहे. आत्मनिरीक्षण करून तो आत्मानंदच प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीन.
आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् ।
यथा संछिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिङ्गला ।।
11.8.44 ।। श्री. भा.
अवधूत सांगतात राजा, जितक्या आशा, वासना मनामध्ये उत्पन्न होतील तितकं जास्ती दुःख आहे. आशा कमी होणं, पूर्ण निर्वासन अंतःकरण होणं हे खरं सुख आहे. त्या पिंगला वेश्येने मनातली आशा टाकून दिल्यावर तिला गाढ झोप लागलेली आहे.
परिग्रहो हि दुःखाय ।।
11.9.1 ।। श्री. भा.
जास्ती संग्रह करणं, आसक्ती ठेवून संग्रह करणं यामुळे दुःख होतं. त्या पक्षाचं उदाहरण दिलंच आहे. साम्यवाद हा निर्माण करायला नकोय. ज्याच्याजवळ जास्ती संग्रह आहे त्याच्याजवळ बाकीचे जाणारच, त्याला त्रास देणार कायदा नकोय. संग्रह हा दुःखदायक आहे हे मनाला विचाराने पटलं पाहिजे. त्यागाकरता संग्रह आहे, हे पटलं पाहिजे.
त्यानंतर मानापमानातून कसं मुक्त व्हावं हे सांगताहेत अवधूत,
न मे मानापमानौ स्तो न चिन्ता गेहपुत्रिणाम् ।
आत्मकीड आत्मरतिर्विचरामीह बालवत् ।।
11.9.3 ।। श्री. भा.
मला कुणाचीही चिंता नाही. घरदाराची नाही. मुलाबाळांची नाही. मी आत्मानंदामध्ये निमग्न आहे. जगामध्ये चिंता केव्हाही नाही असे दोन पुरुष आहेत. आनंदी आहेत. लहान जो बालक आहे तो अज्ञानी आहे पण त्यालाही चिंता नाही आणि गुणातीत झालेला पूर्ण ज्ञानी महात्मा तो एक चिंतामुक्त आहे. त्या बालकाची वृत्ती मी लक्षात घेतली म्हणतात अवधूत. भूक...
लागली की तेवढ्यापुरतं रडायचं, आईने दूध घातलं की पुन्हा खेळायला लागायचं. आई जेवली आहे का उपाशी आहे, भाऊ काय करतोय इकडे कुठे लक्ष नाही. आत्मानंदात तो निमग्न आहे. तो आत्मानंद सापडला मात्र पाहिजे.
त्यानंतर साधकाने कोणाची संगती करावी का नाही याबद्दल सांगताहेत. साधनाभ्यास हा एकट्याने करावा का सर्वांबरोबर करावा याबद्दल एक उदाहरण सांगताहेत. एक कन्या उपवर झाली आणि तिला पाहण्याकरता वरपक्षाची मंडळी घरी आली. घरातली वडील मंडळी कुठे बाहेर गेली होती. त्या मुलीनेच सगळ्यांचा आदरसत्कार केला. मंडळी बाहेर बसलेली आहेत. आणि आत जाऊन ती साळी कांडत बसली. त्यावेळेला सणावारी भात व्हायचा. शेतामध्ये जे होईल तेवढंच ग्रहण करायचं. धान्यसंग्रह करायचा, नसेल तर दुसरीकडून आणायचं, कर्ज काढायचं. पुन्हा लोकसंख्या अधिक आहे, धान्य कमी आहे म्हणूनही सांगायचं. असं सध्या चाललेलं आहे. ती कन्या धान्य कांडायला बसल्यावर तिच्या हातातल्या बांगड्या वाजायला लागल्या. बाहेर पाहुणे आलेले आहेत. बांगड्यांचा आवाज होणं योग्य नाही म्हणून तिने एकेक बांगडी काढायला सुरवात केली. दोन दोनच बांगड्या ठेवल्या. त्याही वाजायला लागल्या. मग एकेकच बांगडी ठेवली तेव्हा आवाज बंद झाला. पुढं तिच्या घरची मंडळी आली. कार्य झालेलं आहे. अवधूत सांगताहेत,
वासे बहूनां कलहो भवेत् वार्ता द्वयोरपि ।
एक एव चरेत्तस्मात् कुमार्या इव कङ्कणः ।।
11.9.10 ।। श्री. भा.
जास्ती मंडळी एकाठिकाणी बसून साधन करू लागली म्हणजे मतभेद आहेत. कलह आहे. जास्ती मंडळींनी साधनाभ्यास करू नये. मग दोघांनीच करावा, मित्रा-मित्रांनी. नाही, मग गोष्टी बोलण्यातच वेळ जातो. मला असा अनुभव आला, असं झालं, म्हणजे साधन राहिलं बाजूला. जेव्हा त्या कुमारीची एकेकच बांगडी राहिली तेव्हा आवाज बंद झाला. यावर संशोधन करणारी बुद्धीवादी मंडळी म्हणतील, कुमारीने एकेकच बांगडी घालावी, असं अवधूतांचं म्हणणं आहे. असा अभिप्राय नाहीये. साधकाने साधनाभ्यास एकट्याने करावा तर मन हे स्थिर होणार. मनाची एकाग्रता अधिकाधिक वाढली पाहिजे म्हणजे मनातले सगळे दोष जातात. मन स्थिर झाल्यानंतर पूर्ण शांती प्राप्त होते.
एक बाण तयार करणारा कारागीर आपल्या दुकानामध्ये बसून बाण तयार करतो आहे, घासतो आहे. दुकानावरून राजाची स्वारी वाजत गाजत गेली तरी त्या कारागिराचं लक्ष त्या...
बाणाकडेच आहे. एकाग्र झालेला आहे. राजकुमारांची परीक्षा घेण्याकरता द्रोणाचार्य सर्वांना घेऊन बाहेर पडले. वृक्षावर एक पक्षी तयार करून ठेवला होता. आणि त्यांनी आज्ञा केली, या पक्षाचं मस्तक तोडून खाली पाडायचं. त्याच्या अगोदर प्रत्येकाला विचारायचे, ""तुला काय काय दिसतंय?'' मला झाड दिसतंय, पक्षी दिसतोय. असे वेगवेगळं सांगणाऱ्यांना त्यांनी म्हणावं, ""बाण सोडू नकोस, तुझी परीक्षा झाली.'' शेवटी अर्जुनाला विचारलं. तेव्हा तो म्हणाला, ""मला फक्त मस्तक दिसतंय''. त्यालाच बाण सोडायला सांगितला आणि मस्तक पडलं. द्रोणाचार्य सांगताहेत, ""तूच केवळ श्रेष्ठ धनुर्धर आहेस.'' मनाची योग्यता जितकी वाढेल तितकी जास्त श्रेष्ठता प्राप्त होते. मनोजयाने सत्वगुण विकसित होतो आणि प्राणजय होतो.
असे अनेक गुरू अवधूतांनी सांगितले आणि म्हणाले, ""राजा, अनात्म पदार्थ मनातून बाजूला करून आनंदरूपी परमात्म्याचं जर चिंतन करायला सुरवात केली. आणि मन जर तिथं स्थिर झालं तर त्याचा साक्षात्कार होतो. जीवभाव नाहीसा होऊन, ईश्वरभाव त्याला प्राप्त होतो. एका पेशस्काराने एका अळीला आपल्या घरट्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. ती अळी त्या भ्रमराचं चिंतन करते आहे, हा भ्रमर आता येईल मला मारेल, मला खाईल असं चिंतन करता करता ती स्वतःच भ्रमररूप होऊन गेलेली आहे. ध्यानाचा प्रभाव आहे. जो ध्यास आपण घेऊ तसा अनुभव आपल्याला येतो. तेव्हा तो आत्मानंद मिळवण्याकडे लक्ष लागलं पाहिजे. अनेक गुरू आहेत. त्यांनी नमुन्यादाखल चोवीस गुरू सांगितलेत. 'जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरू म्या केला.' नाथमहाराजांनी याच्यावर पुष्कळ लिहिलेलं आहे. तीन चार अध्याय याच्यावरच आहेत. सुंदर विवेचन केलेलं आहे. संतमाहात्म्यांनी मराठीमध्ये पुष्कळ स्पष्टीकरण करून ठेवलेलं आहे.
भगवान म्हणतात, "उद्धवा याप्रमाणे अवधूत दत्तात्रेयांनी यदुराजाला उपदेश केला. त्यामुळे त्याचं मन स्थिर झालेलं आहे. शांती मिळाली. उद्धवा सर्वही वर्णांना, आश्रमांना त्यांचे धर्म निरनिराळी कर्तव्य मी सांगितलेले आहेत. वर्णधर्म आहेत. आश्रमधर्म आहेत, लिंगधर्म आहेत. त्या सर्व धर्माचं आचरण निष्काम बुद्धीने, ईश्वरार्पण बुद्धीने जो करतो आहे त्याचं चित्त शुद्ध होतं आहे. द्वैतबुद्धी जी आहे, भेदबुद्धी ही कमी कमी झाली पाहिजे. सर्वत्र एक परमात्मा श्रीहरी आहे अशी अभेद बुद्धी झाली पाहिजे. प्रवृत्ती कमीकमी झाली पाहिजे. यमांचं सेवन, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम आहेत. नियम आहेत. सद्गुरूंकडे जाऊन त्याचं मार्गदर्शन मिळवावं. ह्या शिष्याचे गुण सांगताहेत भगवान,