« Previous | Table of Contents | Next »
पान ५३१
अमानी अमत्सरो दक्षो निर्ममो दृढसौहृदः ।
असत्वरः अर्थजिज्ञासुः अनसूयुः अमोघवाक् ।।
11.10.6 ।। श्री. भा.

ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या शिष्याजवळ हे गुण पाहिजेत. पहिल्याप्रथम अमानित्व पाहिजे, अभिमान उपयोग नाही. मत्सर उपयोग नाही. कर्तव्यदक्ष पाहिजे. ममता उपयोग नाही. दृढ मैत्री पाहिजे. जास्ती गडबड उपयोगी नाही. कोणतंही काम करताना शांत चित्ताने तिकडे लक्ष दिलं पाहिजे. जिज्ञासू पाहिजे आणि सत्य बोलणारा पाहिजे. हे सगळे गुण संपादन करून त्याने सद्गुरूंकडून मार्गदर्शन घ्यावं. स्थूल-सूक्ष्म देहापासून स्वतंत्र असलेला जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाश आहे. लाकडाला जाळणारा अग्नि म्हणजे काही लाकूड होत नाही. त्याच्यापेक्षा अग्नि वेगळाच आहे. तसं सर्व देहामध्ये राहणारा, प्रकाश देणारा आत्मा देहापेक्षा वेगळा आहे. आचार्यांपासून जर हे ज्ञान झालं तर वैराग्य उत्पन्न होते. उद्धवजी विचारताहेत, ""बद्ध कुणाला म्हणायचं आणि मुक्त कुणाला म्हणायचं? हे ओळखायचं कसं? मुक्त झालेलाही शरीरधारीच असतो. तोही सर्वांच्याप्रमाणे व्यवहार करतो, मग ओळखायचं कसं?''

भगवान सांगताहेत, ""वस्तुतः बद्ध आणि मुक्त हे व्यवहार नाहीच आहेत. एक आत्मा जिथे आहे तिथे बद्ध कोण आणि मुक्त कोण? मायामोहामुळे बद्ध आणि मुक्त, मोक्ष आणि बंधन हा भेद उत्पन्न झालेला आहे. शोक, मोह, सुख, दुःख हे त्यामुळे उत्पन्न होतं. संसार हा वासनेमुळे आणि अविवेकामुळे उत्पन्न झालेला आहे. ज्ञान हे मोक्ष देणारं आहे, अज्ञान हे बंधनात टाकणारं आहे. जीव हा वास्तविक माझा अंश आहे. एकच आहे तो, वेगळा नाहीये. तरी अविद्येमुळे, अज्ञानामुळे तो बंधनात पडतो आहे. सुखी दुःखी, संसारी होतो आहे. विद्या ज्याने मिळवली तो मुक्त होतो आहे. या शरीररूपी वृक्षावर दोन पक्षी राहतात. जीव आणि ईश्वर नावाचे. हा जीव त्या वृक्षाची फळं जी उत्पन्न होतील ती भक्षण करतो. दुसरा जो आहे ईश्वर पक्षी तो फक्त पाहतो आहे. हा जीव फल भक्षण करतोय. त्याला काय सुख होतंय, दुःख होतंय याचं निरीक्षण करणारा दुसरा पक्षी म्हणजे ईश्वर आहे. तो तटस्थ आहे. नित्य मुक्त आहे. ज्ञानसंपन्न जो आहे तो मुक्त आहे आणि अज्ञानामध्ये सापडलेला तो बद्ध आहे.

त्यानंतर उद्धवजी विचारताहेत, ""साधू, भगवद्भक्त कसा असतो? आपली भक्ती कशी आहे याचंही स्वरूप मला सांगा.'' भगवंत सांगताहेत.

कृपालुः अकृतद्रोहः तितिक्षुः सर्वदेहिनाम् ।
सत्यसारः अनवद्यात्मा समः सर्वोपकारकः ।।
11.11.29 ।। श्री. भा.
***
पान ५३२

ही साधूची लक्षणं आहेत. पहिला गुण म्हणजे दया. दुःखी जीवाला पाहून दया आहे. सर्वही अज्ञानामध्ये सापडलेले जीव, सुखदुःखामध्ये पडलेले आहेत. त्यांना या दुःखापासून सोडवावं अशी निर्हेतुक दया आहे. त्यामुळे स्वतःचं अमानित्व हे नैसर्गिक आलेलं आहे. त्यांना सुख-दुःखातून मुक्त करायचं आहे ही वृत्ती असल्यामुळे मी मोठा आहे असं वाटेल कशाला? निरहंकार, कुणाचाही द्रोह नाही. सर्व सहन करणं. अंतःकरणामध्ये कोणतीही इच्छा नाही. इंद्रियांचा निग्रह आहे. पावित्र्य आहे. मिताहार आहे. असे अनेक गुण ज्यांच्या ठिकाणी आहेत ते श्रेष्ठ साधू आहेत. भक्त आहेत. माझ्या स्वरूपाचं दर्शन त्यांना झालेलं आहे. पूजा करणारे, ध्यान करणारे, कथाश्रवण करणारे. आत्मनिवेदन करणारे, त्याचप्रमाणे माझ्या सर्व लीलांचं वर्णन करणारे, पर्वकाली सर्व उपचार करून उत्सव करणारे, माझी मूर्ती स्थापन करणारे. एखादं मोठं उद्यान करणं, मंदिर बांधणं, एखादं मोठं स्थान करणं, त्याच्या पूजा इत्यादिकांची व्यवस्था करणं हे सर्वही भक्तीचं स्वरूप आहे. याप्रमाणे भक्ती करणारा जो आहे तो दुःखापासून मुक्त होतो. मूर्तीच्या ठिकाणी पूजा करतात. किंवा सूर्यमंडलात माझंच स्थान कल्पून त्याचीही पूजा करतात. भूमीच्या ठिकाणी पूजा आहे. जलाच्या ठिकाणी आहे. सर्व भूतांच्या ठिकाणी आहे. अतिथी माझेच रूप आहेत. याठिकाणी माझ्या स्वरूपाचं चिंतन करून पूजा करणारा जो आहे तो ही या बंधनातून मुक्त होतो. पूजा करणारा जो आहे तो ही या बंधनातून मुक्त होतो.

भक्ती ही किती श्रेष्ठ आहे हे भगवान सांगताहेत.

केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगाः ।
येऽन्ये मूढधियो नागाः सिद्धा मामीयुरञ्जसा ।।
11.12.8 ।। श्री. भा.

गोकुळात राहणाऱ्या गोपींचं केवळ प्रेम आहे. भक्ती आहे. इतकं निस्सीम प्रेम त्यांच्या मनामध्ये आहे की बाह्य व्यवहार सगळा त्या विसरून गेल्या. कोणतं चांगलं, कोणतं वाईट, लोक आमची निंदा करतात का स्तुती करतात काही तिकडे लक्ष नाही. भगवान गोपालकृष्णांची भक्ती करायची, त्यांच्याकरता सर्व कार्य करायची त्यामुळे त्या केवळ भक्तीने मुक्त झाल्या. त्याकरता योगाभ्यास नको, ज्ञानाभ्यास नको, दानधर्म नको काही नको. म्हणून उद्धवा, हा जो विधीनिषेधात्मक भाव आहे इकडे तू लक्ष देऊ नकोस.

सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।।
18.66 ।। भ. गी.
***
पान ५३३

हा अर्जुनाला केलेला उपदेशच भगवान इथे उद्धवांना करताहेत. अनन्य भावाने माझी भक्ती कर म्हणजे माझी प्राप्ती होईल.

उद्धवजी म्हणताहेत, ""सर्व सोडून द्यायचं? काय तुमच्या वाणीबद्दल मला संशय यायला लागलाय. हे करा, हे करू नका असं विधिनिषेधात्मक तुम्हीच सांगीतलं शास्त्ररूपाने आणि आता सांगताय सर्व सोडून मला शरण ये.'' भगवान म्हणाले, ""जीवाच्या कल्याणाकरता वेदरूपाने मी सर्व सांगितलं. संसारवृक्षाची सुख-दुःखात्मक फल घेणारे जीव आहेत आणि ज्ञानी लोक मात्र आसक्त न होता संसार करताहेत. त्याकरता सद्गुरूंची सेवा करून ईश्वरभक्ती करून ज्ञानरूपी शस्त्र मिळवून या संसारवृक्षाचा छेद करायला हवा. उद्धवा ब्रह्मदेवांचे मानसपुत्र सनकादिक त्यांनी एकदा आपल्या पित्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला.

गुणे षु आविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रभो ।
कथं अन्योन्यसंत्यागः मुमुक्षोः अतितितीर्षोः ।।
11.13.17 ।। श्री. भा.

पिताजी आमचं लक्ष एकंदर बाह्यविषयांकडेच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचामध्ये सर्व विषयांचा अंतर्भाव आहे. त्या विषयांकडून काही सुखाचा आस्वाद मिळाला की ते विषय मनामध्ये येऊन राहतात. संस्काररूपाने. त्यामुळे पुन्हा आपलं मन बाहेर जातं आणि पुन्हा पुन्हा विषय भोगण्याकडेच आपली प्रवृत्ती होते. मन विषयाकडे जाते आणि विषय मनामध्ये येतात. मग मन आणि विषयांचा संबंध सुटायचा कसा? मनाने विषय सोडायचे का विषयांनी मनाला सोडायचं? काय करायचं सांगा. ब्रह्मदेवांना काय उत्तर द्यावं असा प्रश्न पडला. त्यांनी माझं स्मरण केलं. मी हंसरूप धारण करून त्यांच्याजवळ गेलो. त्या ऋषींनी मला विचारलं, ""आपण कोण आहात?'' मी त्यांना विचारलं, ""माझं हे बाहेरचं भौतिक रूप आहे. याला पाहून तुम्ही विचारलं का आतल्या रूपाने कोण आहे विचारलं? बाह्यरूपाने तुमचं शरीर, माझं शरीर पंचमहाभूतांचंच बनलेलं आहे. आणि आत्मरूपाने हा प्रश्न अयोग्य आहे कारण आत्मा एकच आहे. तीन चार वेगवेगळे आत्मे असतील तर तुम्ही कोण आहात हे विचारणं ठीक आहे. तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता मी आलेलो आहे. तुम्ही जे विचारलं, ""चित्त विषयांकडे जातं आणि विषय पुन्हा चित्तामध्ये येतात, वासनारूपाने राहतात. याकरता एक मार्ग आहे. बाह्यविषय आणि अंतःकरण हे ज्या अधिष्ठानावर आहे ते मुख्य अधिष्ठान म्हणजे माझं रूप आहे. माझ्याच सद्रूपाच्या ठिकाणी बाह्यविषयही भासतात आणि अंतरंगही भासतं. त्या अधिष्ठानाकडे जर चित्ताला जाता आलं.

***
पान ५३४

आणि माझ्या स्वरूपाचं अनुसंधान जर ते चित्त करू लागलं तर या दोघांचा संबंध सुटून जातो. ध्यान सांगितलेलं आहे. स्वरूपानुसंधान मुख्य आहे. आत्मस्वरूपाचं अनुसंधान ज्यावेळेला घडायला लागेल त्यावेळी विषयांचा आणि चित्ताचा संबंध सुटून जाईल.

चित्त त्यामध्येच आनंदामध्ये निमग्न होतं. ध्यानाचं हे फल आहे. सर्व संसार हा अहंकाराचा आहे. बुद्धीचा आहे. आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत हे ध्यानाने त्याला समजतं. त्या ध्यानाचा अभ्यास जितका जितका जास्ती होईल; बाहेरचं मन ज्यावेळेला आत्मनिरीक्षण करायला लागेल, आत्मचिंतन करायला लागेल तितकं तितकं त्या प्रकृतीपेक्षा, या बाह्य जगापेक्षा आपण वेगळे आहोत हे लक्षात यायला लागतं. ही बुद्धी जी आहे, अहंकार जो आहे, चित्त आहे त्याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत. हे समजल्याबरोबर संबंध सुटलेला आहे. मद्यपान केलेल्या मनुष्याला जसं भान राहात नाही, अंगावरचं वस्त्र पडलं का आहे काही त्याचं लक्ष नसतं तशी स्थिती समाधीपर्यंत पोचलेल्या माणसाची होते. मी साक्षात तुम्हाला हा मुख्य धर्म काय आहे, चित्ताने काय केलं पाहिजे हे सांगण्याकरता आलेलो आहे.

याप्रमाणे भगवंतांनी उद्धवजींना अनेक मार्ग दाखवलेले आहेत. प्रसंगाने असा योगाभ्यास ज्याचा चालू आहे, ध्यानयोग, सगुणरूपांचं ध्यान असो, निर्गुण स्वरूपाचं ध्यान असो. इतकंच नव्हे अणूचं संशोधन करणारे वैज्ञानिक त्यांना अणूची शक्ती दिसलेली आहे. ध्यानाने सर्व समजतं. ज्या वस्तूच्या ठिकाणी अंतःकरण स्थिर झालेलं आहे त्या वस्तूचं सगळं स्वरूप ध्यानाने कळून येतं. सूक्ष्म वस्तू जी डोळ्याने दिसत नाही तिचं स्वरूपसुद्धा ध्यानाने कळतं. बुद्धीचं सामर्थ्य आहे. ती बुद्धी बाह्यस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायची का आत्मानंदात स्थिर करायची हे समजलं पाहिजे. याप्रमाणे अभ्यास करणारा जो आहे त्याचा संसारभ्रम निघून जातो. जितेंद्रिय पुरुषाला त्या ध्यानाच्या योगाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे त्याची मानसिक शक्ती वाढते. सिद्धी म्हणजे बाहेरून येतात असं नाही. मानसिक शक्तीचा विकास म्हणजे सिद्धी आहे. त्या सिद्धींचं वर्णन भगवंताने केलेलं आहे. काही शारीरीक सिद्धी आहेत. काही मानसिक सिद्धी आहेत. अणू होणं म्हणजे लहान होणं. मारुतीराय सीताशोधाकरता समुद्र उल्लंघन गेले तेव्हा केवढं धिप्पाड रूप घेऊन गेले. संध्याकाळच्या वेळेला तीरावर उतरल्यावर लगेच लहान झाले कारण तिथे प्रगट होऊन उपयोगाचं नव्हतं. सूक्ष्म रूप धारण करूनच राक्षसांच्या राजधानीचा तपास केला पाहिजे. मोठं होणं, लहान होणं या देहाच्या सिद्धी आहेत. हलकं होणं, जड होणं. प्राकाम्य सिद्धी असते, म्हणजे...

***
पान ५३५

संकल्प झाल्याबरोबर त्याप्रमाणे कार्य घडून येतं. त्याचप्रमाणे कोणत्याहि ठिकाणी मन आसक्त न होणं ही एक सिद्धीच आहे.

गुणेषु असंगः वशिता ।।
11.15.5 ।। श्री. भा.

आणखी पुष्कळ सिद्धी आहेत. मनाप्रमाणे वेग असणं, इच्छेप्रमाणे रूप धारण करणं, परकाया प्रवेश करणं, इच्छामरणी होणं, त्रिकालज्ञान असणं, परचित्तज्ञान असणं, अग्नीने, विषाने काहीही बाधा न होणं अशा अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. कोणत्या स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर केलं असता कोणती सिद्धी प्राप्त होते, कोणत्या शक्तीचा विकास होतो हे ही भगवंताने सांगितलं. या शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करता येतो. शंकराचार्यांनी राजाच्या शरीरात प्रवेश करून, सर्व संसार कसा आहे हे समजून घेतलं आणि मग त्या सरस्वतीला उत्तर दिलं. अग्नीमध्ये टाकलं असतानासुद्धा शरीराला त्या अग्नीची बाधा होत नाही. असा मानसिक शक्तीचा विकास पुष्कळ प्रकारांनी करता येतो. मन आणि बुद्धीचा विकास वाटेल तेवढा होऊ शकतो. पण अशा सिद्धींच्या मागे लागणं म्हणजे माझ्याजवळ येणं शक्य नाही. माझ्याजवळ ज्याला यायचं आहे. माझी प्राप्ती ज्याला करून घ्यायची आहे त्याला या सिद्धी म्हणजे विघ्नं आहेत. मला अशी सिद्धी मिळाली पाहिजे, मला असं सामर्थ्य मिळालं पाहिजे अशा हेतूने जर कोणी साधना करेल तर माझी प्राप्ती होणार नाही.

कालक्षणहेतवः ।।
11.15.33 ।। श्री. भा.

जन्मतःच काही सिद्ध पुरुष असतात. वनस्पतींच्या योगाने सिद्धी प्राप्त करून घेणारे असतात. तपाने सिद्धी आहे. मंत्राने सिद्धी आहे. अनेक प्रकारच्या सिद्धी केवळ माझ्या कृपेने प्राप्त होतात.

नंतर उद्धवजींनी विचारलं, ""आपल्या विभूती कोणत्या कोणत्या आहेत ?'' हे विश्व सगळं आपलंच रूप आहे हे खरं आहे. पण या जगात विशेष रूपाने आपण कुठेकुठे असता ते मला सांगा.'' भगवान म्हणाले, ""असाच प्रश्न अर्जुनाने संग्रामाच्या पूर्वी केला होता. त्याला मी हा विभूतीयोग सांगीतला.

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।।
10.20 ।। भ. गी.
***
पान ५३६

सर्वांचा जीवात्मा हे माझं रूप आहे. काल हे माझं रूप आहे. त्याचप्रमाणे महत्त्व आहे.

दुर्जयानामहं मनः ।।
11.16.11 ।। श्री. भा.

मन ही माझी विभूती आहे. अजिंक्य म्हणून जे आहे त्याच्यामध्ये मन हे माझं रूप आहे. मंत्रामध्ये प्रणव मी आहे. अक्षरामध्ये अकार मी आहे, सर्व देवांमध्ये इंद्र मी आहे. अशा पुष्कळ विभूती त्यांनी सांगीतल्या

मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ।।
11.16.27 ।। श्री. भा.
अहं युगानां च कृतम् ।।
11.16.28 ।। श्री. भा.

युगामध्ये कृतयुग मी आहे, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे, व्यासांच्यामध्ये द्वैपायन व्यास मी आहे. विशेष लोकोत्तर तेज ज्याठिकाणी असेल, पूर्ण कीर्ती ज्या ठिकाणी असेल; नियामक शक्ती ज्याठिकाणी असेल, त्याग ज्याठिकाणी आहे, औदार्य आहे त्या सगळ्या माझ्या विभूती आहेत. त्या विभूतीमध्ये कुठेतरी मन ठेवायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. माझं सूक्ष्म रूप काही दिसत नाही मग विभूतीचंच ध्यान करून पुढे जायचंय याकरता हे सांगितलं. वस्तुतः सर्वांचा निग्रह केला पाहिजे. ध्यान तरी कुठं पाहिजे. वाणीचा, मनाचा, प्राणाचा, इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे. निग्रहातून हे सगळं समजून येतं.

त्यानंतर वर्णाश्रमांचा आचारधर्म कोणता आहे हे उद्धवजींनी विचारलं, भगवंतानी योगमार्ग सांगितला, सांख्यमार्ग सांगितला. सर्व विभूतींचं वर्णन केलं. कोणत्या कोणत्या धारणेनं कोणती सिद्धी मिळते हेही सांगितलं आणि आता चार वर्ण आणि चार आश्रम यांचे धर्मही त्यांनी सांगितलेले आहेत. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी असे चार आश्रम आहेत. त्यातही ब्रह्मचर्यामध्ये चार भेद आहेत, वानप्रस्थात, संन्यासाश्रमात चार भेद आहेत. या चार वर्णांचे, आश्रमांचे जे आचारधर्म सांगितलेले आहेत त्याच्या आचरणाने अंतःकरणाची शुद्धी होते आणि मग भगवद्भक्तीच्या योगाने ज्ञान प्राप्त होतं. भक्तीनेही अंतःकरण स्थिर होतं; शुद्ध होतं म्हणजे हे आचरण करणे हा शास्त्रीय प्रयत्नवाद आहे. श्रुती हे मुख्य प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाने वागणं हे मुख्य आहे.

उद्धवा माझ्या भक्तीचं कारण काय आहे ? भक्ती कशी उत्पन्न होईल ते ही सांगतो.

श्रद्धा अमृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनम् ।।
11.19.20 ।। श्री. भा.
***
पान ५३७
परिनिष्ठा च पूजायां स्तुतिभिः स्तवनं मम ।।
11.19.20 ।। श्री. भा.

ही भक्तीची साधनं आहेत. माझ्या अमृतमय कथा ऐकण्यासाठी श्रद्धा पाहिजे. त्या कथा श्रवण केल्यानंतर मुखाने त्यांचं संकीर्तन केलं पाहिजे. पूजा करण्याविषयी चित्त अत्यंत आस्थासंपन्न पाहिजे. वाणीने माझी स्तुती केली पाहिजे. गुणज्ञान असल्याशिवाय स्तुती होत नाही म्हणून श्रवण-कीर्तन पाहिजे. वंदन करणं, माझ्या भक्तांची पूजा करणं, सर्व ठिकाणी माझी भावना करणं. सर्व कामनांचा त्याग करणं, भोग, सुख सर्वही माझ्याकरता सोडून देण्याची तयारी पाहिजे. जे जे कर्म केले असेल, यज्ञ याग, जप जाप्य, दान धर्म हे सर्वही मला निवेदन करणं. अशा या साधनांनी,

मयि संजायते भक्तिः ।।
11.19.24 ।। श्री. भा.

खरी भक्ती उत्पन्न होते. द्वंद्वमोह गेल्याशिवाय भक्ती उत्पन्न झाली असं समजता येत नाही.

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ।।
7.28 ।। भ. गी.

भगवद्गीतेतही भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितलं. पापक्षय झाल्यानंतर हा द्वंद्वमोह दूर होतो आहे. अविवेक दूर झाला म्हणजे मग भजनाला, भक्तीला सुरवात होते आहे. मग त्याला काहीही कमी राहात नाही. काही प्रश्न उद्धवजींनी केलेले आहेत. दान कशाला म्हणावं, तप कशाला म्हणावं, त्याग म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, शम, दम म्हणजे काय. त्याची उत्तरं भगवंताने थोडक्यात दिली. भगवान सांगतात.

शमो मन्निष्ठता बुद्धेर्दम इंद्रियसंयमः ।।
11.19.36 ।। श्री. भा.

शम म्हणजे बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर होणं. इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम आहे. सर्व दुःख सहन करणं म्हणजे तितिक्षा आहे. जिव्हा आणि उपस्थ यांना जिंकणं म्हणजे धैर्य आहे.

दण्डन्यासः परं दानं ।।
11.19.37 ।। श्री. भा.

दंडन्यास करणं. ""दंडः भूतद्रोहः'' श्रीधरस्वामींनी व्याख्या केली. भूतद्रोह टाकून देणे. ""कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वरा पूजनाचे'' तुकाराम महाराज जे सांगतात यालाच दान म्हणतात. हे खरं दान आहे. कुणाचाही द्रोह करायचा नाही हे दान करायला पैसा लागत नाही.

कामत्यागस्तपः स्मृतम् ।।
11.19.37 ।। श्री. भा.
***
पान ५३८

मनातल्या सर्व वासना सोडणं हे तप आहे. कोणत्या वासनेनं कोणतं कर्म आपल्या किंवा इतरांच्या हातून घडतं आणि त्याचं फल काय मिळतं हे पाहून त्याचा त्याग करणं. निष्काम अंतःकरण करणं याचं नाव तप आहे.

विद्या आत्मनि भिदाबाधः ।।
11.19.40 ।। श्री. भा.

आत्मे अनेक आहेत असं नाही. एक आत्मा आहे सर्वव्यापी ही विद्या आहे. ज्ञान आहे. निरपेक्ष राहाणं, संतुष्ट राहाणं हे गुण म्हणजेच श्री आहे; ऐश्वर्य आहे.

मूर्खो देहाद्यहंबुद्धिः ।।
11.19.42 ।। श्री. भा.
पण्डितो बन्धमोक्षवित् ।।
11.19.41 ।। श्री. भा.

देहाच्या ठिकाणीच अहंकार धारण करणारा हा मूर्ख आहे. अज्ञानी आहे. आणि बंध, मोक्ष हे सगळं ज्याला बरोबर समजतं तो पंडित आहे. चित्त विक्षेप होणं, नेहमी विक्षिप्त अवस्थेत राहाणं हा वाईट मार्ग आहे.

दरिद्रो यस्त्वसंतुष्टः कृपणो योऽजितेन्द्रियः ।
गुणेषु असक्तधीः ईशः ।।
11.19.44 ।। श्री. भा.

नेहमी असंतुष्ट असणारा दरिद्री आहे. बाहेर संपत्ती असेल पण मनामध्ये संतोष नाही. आपल्या इंद्रियांच्या आधीन होणाऱ्याला कृपण म्हणतात. पण या विषयाच्या ठिकाणी कधीही ज्याचं चित्त आसक्त होत नाही तो श्रेष्ठ आहे, समर्थ आहे.

गुणदोषदृशिर्दोषः गुणस्तु उभयवर्जितः ।।
11.19.45 ।। श्री. भा.

हा गुण आहे हा ग्रहण करावा, हा दोष आहे याचा त्याग करावा ही बुद्धीच दोष आहे. हे कशाला पाहिजे ? निवृत्ती जितकी होईल आणि जितकं मन स्थिर होऊन परमेश्वराच्या ध्यानात निमग्न होईल तो खरा गुण आहे.

याप्रमाणे भगवंताने सर्व काही सांगितलं. भक्ती, ज्ञान, कर्म यापैकी आपला अधिकार जिथे असेल त्याचं आचरण त्याने करावं. शुद्धी, अशुद्धी सगळी शास्त्राने दाखवलेली आहे. पण कर्म करण्याचा अधिकार ज्याला आहे त्याच्याकरता ते आहे. कालशुद्धी कोणती, देशशुद्धी कोणती, अन्नशुद्धी कोणती हे सगळं सांगितलेलं आहे. शुद्ध असलेलं सुद्धा काही ठिकाणी अशुद्ध होतं. हे सांगताहेत भगवान. पुष्पाची शुद्धी फक्त प्रोक्षणाने होते पण त्यानंतर जर त्या फुलाचा वास घेतला

***
पान ५३९

तर ते अशुद्ध झालं ! शास्त्रानेच समजायचंय बाहेरून काय दिसणार आम्हाला ? त्याचप्रमाणे अन्न शिळं झालं तर ते अशुद्ध आहे. अशौच, सुतक असताना त्यातलं अन्न ग्रहण करणं हे अशुद्ध आहे. जो श्रीमंत आहे त्याला नवीन अन्न परवडू शकतं. पण जो दरिद्री आहे त्याने सुतकी अन्न खाल्लं तर ते अशुद्ध नाहीये; तो असमर्थ आहे ना ! मुलगा झाल्यानंतर दहा दिवसांनंतर कळलं तर शुद्धी आहे; आज कळलं तर अशुद्धी आहे. श्रीमंत माणसाने फाटलेलं वस्त्र धारण करणं म्हणजे अशुद्ध आहे, दरिद्री माणसाला ते शुद्ध आहे. हे सगळेही विचार त्यांनी मुद्दाम सांगितले. धान्याची शुद्धी, काष्ठाची शुद्धी, सुवर्णाची शुद्धी. त्या त्या कालाने शुद्ध होतात. धान्य हे कालाने शुद्ध होतं. काष्ठ हे वायूने शुद्ध होतं. गजदंत अग्नीने शुद्ध होतात. मृत्तिकेने शुद्ध होणारी पात्रं आहेत. हे सगळं कर्ममार्ग आचरण करणाऱ्याला सांगितलेलं आहे. त्याचं आचरण करून, सर्व कर्म ईश्वरापण बुद्धीने करणारा मुक्त होतो असा उपदेश भगवंतांनी उद्धवजींना केलेला आहे.

आता ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता तितिक्षा पाहिजे आहे. परमार्थामध्ये सहनशीलता पाहिजे. त्याशिवाय ज्ञान उत्पन्न होणार नाही, उत्पन्न झालं तरी ते दृढ राहणार नाही. म्हणून उद्धवा ह्या दुर्जन लोकांनी तुला त्रास दिला, मारलं, बांधून ठेवलं तरी सुद्धा खरं कल्याण जर तुला करून घ्यायचं असेल तर तुला हे सर्व सहन करावं लागेल. आत्मानुसंधान करायचं आहे ना ! आत्मानुसंधान करायला बुद्धी ही विवेकसंपन्न पाहिजे, स्थिर पाहिजे. या मानापमानाकडे तुझं लक्ष गेलं की तितिक्षा गेली. त्याने मला त्रास दिला, मी त्याला त्रास देणार हे संपत नाही कधी. तितिक्षा असली म्हणजे संपलं, सगळं सोडून दिलेलं आहे. उद्धवजी म्हणाले, ""देवा हे किती कठीण आहे. दुसऱ्याने त्रास दिला असताना सर्व सहन करणं हे अत्यंत कठीण आहे.'' भगवंताने एक कथा सांगितली.

दुरुक्तैः भिन्नमात्मानं यः समाधातुमीश्वरः ।।
11.23.2 ।। श्री. भा.

दुर्जनाने कितीही निंदा केली तरी त्याच्या चित्तावर काहीही परिणाम होत नाही, जो शांत राहतो तो साधू आहे. नाथमहाराजांचंही उदाहरण प्रसिद्ध आहे. हे जे दुर्जन आहेत, त्यांचा स्वभावच त्रास देण्याचा आहे. सहन करणं हा सज्जनांचा स्वभाव आहे. त्याकरता एका भिक्षूची गोष्ट तुला सांगतो. दुर्जनांनी त्याला कितीही त्रास दिला तरी त्याची तितिक्षा इतकी आहे की त्यामुळे त्याचं ज्ञान दृढ राहिलेलं आहे. तो संन्यासी प्रथमतः मोठा श्रीमंत होता. खूप पैसा त्याने मिळवला. पण अत्यंत रागीट आणि लोभी होता तो. त्या पैशाचा उपयोग आपल्या लोकांसाठीही त्याने केला नाही आणि दानधर्मही केला नाही. धर्मही नाही आणि उपभोगही नाही. दानधर्म नाही, कशाकरताही

***
पान ५४०

द्रव्याचा उपभोग न केल्यामुळे देवतांचा कोप झाला आणि त्याचं द्रव्य नष्ट झालं. आप्तेष्टांनी काही द्रव्य नेलं, काही चोरांनी नेलं. घराला आग लागली त्यात सगळं नुकसान झालं. धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही, सर्व आप्तेष्टांनी त्याला सोडून दिलं, याची संगत नको म्हणाले. एकटा पडला. तो विचार करतोय आणि त्याच्या मनात एकदम वैराग्य उत्पन्न झालं. पश्चात्ताप झालेला आहे. आजपर्यंत माझं आयुष्य फुकट गेलं म्हणाला. व्यर्थ परिश्रम केले. धर्माकरता उपयोग नाही, भोगाकरता उपयोग नाही. थोडा जरी लोभ मनामध्ये उत्पन्न झाला तरी बाकीच्या गुणांची हानी होते.

अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये ।
नाशोपभोग आयासः ।।
11.23.17 ।। श्री. भा.

सगळे श्रम आहेत. मिळवायचे श्रम आहेत. वाढवायचे श्रम आहेत. रक्षण करण्याचे श्रम आहेत. नाश झाला म्हणून दुःख आहे. नेहमीच दुःख आहे. चोरीची भीती आहे. कोणीतरी हिंसा करण्याची, त्रास देण्याची भीती आहे. काम, क्रोध, लोभ अनेक विकार यामुळे उत्पन्न होतात. अविश्वास उत्पन्न होतो. पंधरा अनर्थ सांगीतलेले आहेत अर्थामुळे उत्पन्न होणारे. ज्याला आत्मकल्याण करून घ्यायचंय त्याने अर्थापासून दूर राहायचंय. बंधूंची बुद्धी भिन्न होते, स्त्री, पुत्र, मित्र इत्यादी निघून जातात. सर्वांच्या मनात अविश्वास उत्पन्न होतो. त्या भिक्षूने ठरवलं. यापुढे कुठेही मन न गुंतवता, परमेश्वरचिंतन करून सर्वठिकाणी फिरायचं. आपल्याला सगळे सोडून गेलेले असल्यामुळे काही जबाबदारीही नाही. म्हणून संन्यासदीक्षा धारण करून तो भिक्षू फिरतो आहे. मिळेल ती भिक्षा घ्यायची आणि त्याच्यावर निर्वाह करायचा. पण दुर्जनांनी त्याला त्रास द्यायला सुरवात केली. कुणी त्याचा दंड घेतला, कुणी कमंडलू घेतला, कुणी माळ घेतली. लोक म्हणायला लागले, ""काय ढोंगी संन्यासी आहे. आधी नुसता पैसा, पैसा करून अत्यंत कृपण होता, आता पैसा गेल्यामुळे संन्यास घेऊन सगळ्यांना फसवतोय.'' असा लोकांनी त्याचा अपमान करावा, चेष्टा करावी, त्याला बांधून ठेवावं, मारावं, पण त्याला जे धैर्य मिळालेलं आहे. आत्मचिंतनाने, त्याने त्याचा विवेक जागृत आहे. तो विचार करतोय, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप जे होताहेत हे आपलं दैव आहे.

आत्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तं अबुध्यत ।।
11.23.41 ।। श्री. भा.
नायं जनो मे सुखदुःखहेतुः ।।
11.23.50 ।। श्री. भा.
« Previous | Table of Contents | Next »