न देवतात्मा ग्रहकर्मकालाः ।
मनः परं कारणमामनन्ति ।
संसारचक्रं परिवर्तयेद्यत् ।।
11.23.43 ।। श्री. भा.
लोकांनी किती जरी त्रास दिला तरी याच्या मनामध्ये जे विचार येत आहेत त्यामुळे बाहेरच्या जगाकडे लक्षच नाहीये. हे लोक मला त्रास देणारे नाहीत. खरा त्रास कुणापासून होतो तो विचार करतो आहे. देवतांमुळे त्रास नाही, ग्रहांचा त्रास नाही, कर्मामुळे त्रास नाही. सगळे कार्यकारण भाव त्याने काढून टाकले आणि सांगतोय की हे मनच सर्व त्रासाला कारण आहे. हर्ष, विषाद मनामुळे उत्पन्न होतात आणि त्याला निमित्त झालेले, शत्रू, मित्र होतात. मनच संसार चक्र चालवतं. मनामध्ये वासना उत्पन्न होतात. चांगली, वाईट कर्म होतात. आणि त्याप्रमाणे जन्माला जावं लागतं. आत्मस्वरूपाला काही कर्माचा संबंध नाही, हे मनामध्ये येतच नाही. आत्मा निष्क्रिय आहे. दान केलं पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे, यम नियमांचं आचरण केलं पाहिजे ही सगळी मनोनिग्रह करण्याकरता साधनं सांगितलेली आहेत. ज्याने विचाराने आपल्या मनाचं समाधान केलेलं आहे, स्थिर मन केलेलं आहे त्याला काहीही करण्याचं कारण नाही. ज्याचं मन शांत आहे त्याने दानधर्म वगैरे करायचं काहीही कारण नाही! त्याला काय पुण्य मिळवायचंय? पुण्यपापाच्या पलिकडे तो गेलेला आहे. आणि ज्याच्या ताब्यात मन नाही त्यानेही दानधर्म करून उपयोग नाही कारण मन त्याच्या ताब्यात नाहीच आहे; नुसतं बाहेरून करून काय उपयोग? मनाच्या स्वाधीन सर्व आहे. जिंकता न येणारा शत्रू म्हणजे मन आहे. ज्याने मनाला जिंकलेलं आहे. त्याला सुख नाही, दुःख नाही, तो तरून गेलेला आहे. लोकांनी दुःख दिलं असं जरी मानलं तरी कुणाला दुःख दिलं? बांधून कुणाला ठेवलं? मारलं कुणाला? देहाला मारलं. देह म्हणजे मी आहे असं ठरविणारं मन आहे. खरा विवेक जर मनामध्ये उत्पन्न झाला तर देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे असं लक्षात येतं. मग आत्म्याला कुठं मारलं? आत्म्याला कुठं त्रास झाला? असं अंतर्निरीक्षण करतो आहे तो भिक्षू! कर्माने दुःख झालं, ग्रहांनी दुःख झालं तरी देहाला दुःख होतंय. आत्मस्वरूपाला सुख नाही, दुःख नाही, काही नाही, पुण्य नाही, पाप नाही.
सुखदुःखप्रदो नान्यः पुरुषस्यात्मविभ्रमः ।
मित्रोदासीनरिपवः संसारस्तमसः कृतः ।।
11.23.60 ।। श्री. भा.
उद्धवजी, तो भिक्षू अत्यंत विवेकसंपन्न झाल्यामुळे सर्व दुःखातून मुक्त झालेला आहे.
कुणीही सुख दुःख देणारा नाहीये. आपलाच भ्रम आहे. संसार हा अज्ञानाने, अविवेकाने झालेला आहे. म्हणून या मनाचा निग्रह ज्याला साध्य झालेला आहे आणि ते मन माझ्याठिकाणी स्थिर करता आलं तोच मुक्त होतो आहे हे सगळ्याही साधनांचं सार आहे.
असे सर्व मार्ग भगवंताने सांगितलेले आहेत. भगवद्भक्ताचं महत्त्व सांगितलं. अशी सर्व साधनं भगवंताने उद्धवजींना समजावून सांगितली. शेवटी भगवंताचं अर्चन कसं करावं हेही सविस्तर सांगितलं. पूजा कशी करावी. आरंभीला न्यास, ध्यान हे सगळं त्यांना समजावून सांगितलेलं आहे. शेवटी भगवान म्हणताहेत.
एष तेऽभिहितः कृत्स्नो ब्रह्मवादस्य संग्रहः ।
समास व्यास विधिना देवानामपि दुर्गमः ।।
11.29.23 ।। श्री. भा.
काही संक्षिप्त सांगितलं, काही सविस्तर सांगितलं. देवांनासुद्धा हे सगळं माहिती नाहीये. प्रत्यक्ष भगवान सद्गुरू म्हणून त्यांना मिळाले असे उद्धवजी भाग्यवान आहेत. भगवान सांगताहेत, ""मी सांगितलेल्या गोष्टीचा तू विचार कर आणि ब्रह्मप्राप्ती करून घे. भक्तांना हे ज्ञान तू दे, त्यांना उपदेश कर.'' उद्धवजींना आनंद झाला. कंठ दाटून आलेला आहे. आता भगवंतांना सोडून राहायचंय. ""भगवन्, माझ्या मनातील मोहरूपी अंधःकार दूर झालेला आहे. अर्जुनाचं अंतःकरण भगवंताने निर्मोही केलं ते कर्माकडे त्याची प्रवृत्ती जावी म्हणून.
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा...
18.73 ।। श्री. भ. गीता
असं अर्जुनाने कबूल केलं. इथं उद्धवजींना तर मुक्तच केलेलं आहे. आपल्या जवळचं आत्मज्ञान त्यांना देऊन टाकलेलं आहे. हाच एक अधिकारी महात्मा आहे म्हणाले.
नोद्धवोऽण्वपि मन्न्यूनो यद्गुणैर्नार्दितः प्रभुः ।।
3.4.31 ।। श्री. भा.
भगवान सांगताहेत, ""जा उद्धवा, बदरिकाश्रमात जा, अलकनंदेमध्ये स्नान कर. तू पवित्र होशील. वल्कल धारण कर. वनामध्ये मिळणारी फळं भक्षण कर. सुखाची इच्छा मनामध्ये ठेवू नकोस. सर्व द्वंद्व सहन कर. आणि माझं अखंड चिंतन कर म्हणजे या त्रिगुणात्मक गतीच्या पलिकडे तू जाशील. उद्धवजींनी प्रदक्षिणा केली. चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. नेत्रातून अश्रुधारा वाहताहेत. ज्ञान प्राप्त झालं तरी भगवत्प्रेम अखंड आहे कारण लहानपणापासून तसा अभ्यास आहे. भगवंताच्या पादुका मस्तकावर धारण करून उद्धवजी निघून गेलेले आहेत. भगवंताच्या...
आशीर्वादामुळे, कृपेमुळे ते कृतार्थ झाले आणि उत्तम गती त्यांना प्राप्त झालेली आहे.
परीक्षित राजा विचारतोय, ""पुढं काय झालं?'' शुक सांगताहेत, ""राजा अत्यंत भयंकर अपशकुन व्हायला लागले. भगवंतानी सांगितलं. आता द्वारकेमध्ये कुणी राहू नका. सर्व स्त्रिया, बाल, वृद्ध यांना शंखोद्धार तीर्थाकडे जाऊ दे. आपण प्रभास क्षेत्रात जाऊ या. स्नान करू, देवतांची पूजा करू. ब्राह्मणांना दानधर्म करू. सर्व यादव मंडळी नावेतून पलिकडे प्रभास क्षेत्रात येऊन पोहोचलेली आहेत. सगळी पुण्यकर्म त्यांनी केली. मध्येच कशी दुर्वासना उत्पन्न झाली कळत नाही. पुण्यवासना नव्हती अशी नाही. भगवंताच्या संकल्पाने झालं म्हणावं तर मग व्हायचं कसं? उद्धवजींना ज्ञानमार्ग अबाधित ठेवण्याकरता भगवंताने विप्रशापातून मुक्त केलं. मग हा कर्मयोग नको राहायला का? यादव हे काही नास्तिक नाही आहेत. परंतु ईश्वराच्या आज्ञेचं पालन करत असताना मध्येच असा लोकांचा अपमान होतो आहे आणि त्याचं फल भोगावं लागतंय. सर्वांचं भोजन झालं आणि सर्वांनी मद्यपान केलेलं आहे. बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्यांच्यात बोलाचाली सुरू झाली. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढू लागले. रागावलेले आहेत आणि युद्धाला सुरवात झाली. घोड्यावर बसलेले आहेत, हत्तीवर बसलेले आहेत. निरनिराळ्या वाहनांमध्ये बसून एकमेकांचा नाश करताहेत. प्रद्युम्न, अनिरुद्ध, सांब, अक्रूर, सात्यकी सगळे मोठे मोठे यादव वीर, कृष्णभक्त असलेले, आज्ञापालन करणारे पण यावेळेला सगळं गेलं. मनातल्या सगळ्या दुर्वासना, तमोगुण सगळा उफाळून आला. आता हे सगळे देवच आलेले होते, भगवंताला साहाय्य करायला. त्यांच्या त्यांच्या स्थानाला परत पाठवायचं होतं की काय कुणास ठाऊक. आणि यांच्या वृत्तीमुळे हा धर्ममार्ग पुढे शुद्धरीतीने राहील की नाही असंही वाटलं की काय कुणास ठाऊक. पिता-पुत्र, मित्र-मित्र, भाऊ-भाऊ अशी लढाई सुरू झाली, बाण संपले, मग त्या लव्हाळ्याच्या बेटातली ती लव्हाळीच उपटून घेतली आणि त्यानेच एकमेकांना मारू लागले. बलराम, कृष्ण मध्ये पडले असता त्यांच्याच अंगावर धावून गेले, इतका विलक्षण परिणाम मनावर झालेला होता. मग राम-कृष्णही रागावलेले आहेत आणि त्यांनी त्या यादवांचा नाश केलेला आहे. वाऱ्याने एकमेकावर वेळू घासून अग्नि उत्पन्न झाला आणि ते संबंध वन जळून गेलेलं आहे. भूमीचा भार संपला म्हणाले भगवान. बलरामजी समुद्रतीरावर गेले आणि योगमार्गाने आपल्या शरीराचा त्यांनी त्याग केलेला आहे. एका अश्वत्थ वृक्षाखाली भगवान बसून राहिलेले आहेत. आपल्या...
एका मांडीवर, दुसरा पाय ठेवला आणि टेकून बसले. मुसळातल्या राहिलेल्या तुकड्याचा त्या जरा व्याधाने बाण तयार केला होता. तो शिकारीला आलेला होता आणि लांबून पाहतोय तर भगवान श्रीकृष्णांचा पाय म्हणजे त्याला हरिणाचं मुख वाटलं. आणि त्याने तो बाण बरोबर त्या पायावर मारलेला आहे. मर्मस्थली तो बाण लागला. तो व्याध आला जवळ आणि त्याच्या लक्षात आलं की आपण हरिणाला नव्हे, देवाला बाण मारलेला आहे. पायावर डोकं ठेवलं त्या व्याधाने आणि म्हणाला, ""मला मारा, माझ्या हातून चूक झालेली आहे.' भगवान सांगताहेत, ""जा, स्वर्गलोकाला जा. तुझ्या इच्छेने हे झालेलं नाहीये.' विमानामध्ये बसून तो जरा व्याध स्वर्गलोकाला गेलेला आहे. भगवंतांचा सारथी दारुक शोध करीत त्याठिकाणी आलेला आहे. दारुकाने भगवंताला साष्टांग नमस्कार केलेला आहे. तेवढ्यात तो दिव्य रथ, घोडे, अस्त्रं सगळी आकाशात निघून गेलेली आहेत. तिथूनच आली होती. भगवंतांची शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधंही गेलेली आहेत. सारथ्याला भगवान सांगताहेत,
गच्छ द्वारवतीं सूत ज्ञातीनां निधनं मिथः ।
संकर्षणस्य निर्याणं बन्धुभ्यो ब्रूहि मदशाम् ।।
11.30.46 ।। श्री. भा.
सगळे यादव गेले म्हणून निरोप दे. बलरामांचही निर्याण झालंय. माझी आता अशी दशा आहे, मी काही येऊ शकत नाही. सगळ्यांना जाऊन सांग. द्वारकेत कुणीही राहू नका. ही द्वारका आता समुद्रामध्ये बुडून जाणार आहे. सर्वांनी आपापला परिवार घेऊन अर्जुनाबरोबर इंद्रप्रस्थाला जावं. तू ही माझं चिंतन करून, ही विश्वरचना म्हणजे माझी माया आहे असं समजून शांत रहा. असा उपदेश भगवंतानी दारुकाला केलेला आहे.
ब्रह्मादिक देव आकाशमंडळात आलेले आहेत, भगवंतांचं निर्याण कसं होतं ते पहायला. सर्वांकडे एकदा भगवंताने पाहिलं आणि आपले डोळे झाकून घेतलेले आहेत. भगवंताने आपलं शरीर दग्ध केलं नाही. भगवान श्रीकृष्णांचं ते दिव्य, पवित्र आणि सुंदर शरीर हे एकदम अंतर्धान पावलेलं आहे! त्याच्याबरोबर सत्य, धर्म, धृति, कीर्ती हेही निघून गेलेलं आहे. ब्रह्मादिक देवांना, भगवान वैकुंठलोकामध्ये केव्हा आले हे कळलं देखील नाही. त्यांची ती योगगती पाहून सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटलेलं आहे.
शुक्राचार्य सांगताहेत, ""परीक्षित राजा, सर्वही जीवांचे क्लेश दूर व्हावेत, म्हणून भगवान आले होते. अनंत लीला करून पुन्हा निजधामाला ते गेले. सांदीपनी गुरुमहाराजांचा यमलोकामध...
गेलेला मुलगा त्यांनी परत आणून दिला. तुझंच उदाहरण पहा ना. आईच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्रामुळे तू दग्ध होणार होतास पण तुझं संरक्षण भगवंताने केलेलं आहे. बाण मारणाऱ्या व्याधाला ज्याने स्वर्गलोकाला पाठवलं, त्याला स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य नव्हतं काय?
नैच्छत् प्रणेतुर्वपुरात्र शेषितं ।
मर्त्येन किं स्वस्थगतिं प्रदर्शयन् ।।
11.31.13 ।। श्री. भा.
इथं आता राहायचं नाही असं आता भगवंतानी ठरवलं. दारुकाने द्वारकेत येऊन वसुदेव, देवकी, उग्रसेन वगैरे वडिल मंडळींना सर्व वृत्त त्याने सांगितलं. सर्व यादव गेले, राम-कृष्णही गेलेले आहेत. हे कानावर पडल्यावरच कित्येकजण गतप्राण होऊन पडलेले आहेत. सर्व मंडळी प्रभास क्षेत्रात आली, पाहताहेत सर्वजण मरून पडलेले आहेत. राम-कृष्ण दिसत नाहीत. वसुदेव, देवकी, रोहिणी यांचंही प्राणोत्क्रमण झालेलं आहे. भगवत्विरह सहन झाला नाही. सर्व यादवस्त्रियांनी आपापल्या पतीचं शरीर घेऊन सहगमन केलेलं आहे. रामपत्नी, वसुदेवपत्नी, रुक्मिण्यादिक सर्व स्त्रियांनी सहगमन केलेलं आहे. अर्जुनाला भगवंताच्या वियोगामुळे अतिशय दुःख झालेलं आहे. कसं तरी मनाचं समाधान करून घेऊन बाकी राहिलेल्या वृद्ध मंडळींना, लहान मुलांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थ नगरात आलेला आहे. अनिरुद्धाचा पुत्र वज्र याला त्यांनी अभिषेक केला. कृष्णनिर्याण झाल्याचं ऐकून तुझे पितामह धर्मराज, भीम वगैरेंनी उत्तरेकडे प्रयाण केलं आणि त्यांचही निर्याण झालेलं आहे. असं हे भगवंतांचं दिव्य चरित्र राजा तुला निवेदन केलेलं आहे.
पुढे शुक्राचार्यांनी, भगवान श्रीकृष्ण निजधामाला निघून गेल्यानंतर कोणाकोणाचे वंश झाले याबद्दल थोडक्यात परीक्षित राजाला सांगीतलं. कलीचे काय काय दोष आहेत, कलियुगामध्ये काय काय होणार आहे हे सगळं त्यांनी सांगीतलं. भगवंतांचं नामस्मरण करणारा जो आहे तोच या कलिदोषातून मुक्त होतो. कालाचं वर्णन करताना प्रलयाबद्दल सांगताहेत. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, आत्यंतिक प्रलय, महाप्रलय वगैरे सांगताहेत. ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता त्यावेळेला त्रैलोक्याचा प्रलय होतो. हा नैमित्तिक प्रलय आहे. ब्रह्मदेवांची निद्रा ही त्याला निमित्त आहे. ब्रह्मदेवांचं आयुष्य संपल्यानंतर ब्रह्मदेवही मुक्त होतात. त्यावेळी सप्त्तप्रकृतीचा प्रलय होतो, हा महाप्रलय आहे; प्राकृतिक प्रलय असंही याला म्हणतात. सबंध ब्रह्मांडाचा विनाश होतो आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर सर्व विश्वाभास मावळून जाणं याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. मोक्ष...
त्याला म्हणतात. कालज्ञानाच्या दृष्टीने नित्य प्रलयही आहे असं म्हणतात. "सर्वं क्षणिकं, क्षणिकं" हे आहे का आणखीन काहीतरी आहे सांगता येत नाही. प्रवाहनित्यता काही मानतात म्हणजे तो नित्यप्रलयच आहे. प्रत्येकाचं रूपांतर होतो आहे. असं हे प्रलयासंबंधीचं विवेचन शुक्राचार्यांनी केलेलं आहे. आणि शेवटी त्याला विचारताहेत, राजा आज मला मृत्यू येणार आहे अशी तुला भीती वाटत नाही ना? अशी भीती वाटणं ही पशुवृत्ती आहे. तू जन्मालाही आलेला नाहीस आणि तुला मृत्यूही नाही. हे सगळे देहाचे धर्म आहेत. देह जन्माला आलेला आहे. देहाचा नाश होणार आहे. आणि परंपरेने मुलगा, नातू, पणतू या रूपाने तू राहणारच आहेस. अजरामर आत्मस्वरूप जे आहे तिकडे तू लक्ष दे. परमात्म्याच्या लीला तू ऐकल्या आहेस त्याचं चिंतन कर. समाधीमध्ये तू निमग्न राहा; म्हणजे तक्षक आला, तुला दंश केला याचं भानही तुला राहणार नाही.
याप्रमाणे परीक्षित राजाने सर्व श्रवण केलं. शुक्राचार्य महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं. तो म्हणाला, ""महाराज, आपण दयाळू होऊन हा मार्ग मला दाखवला. हरीच्या सर्व लीला मला सांगितल्या. आपल्या मुखातून भागवत पुराण मला ऐकायला मिळालं. आता मला मृत्यूची भीती वाटत नाही. निर्भय अशा श्रीहरीच्या चरणाजवळ मी प्राप्त झालो आहे. आता त्याचं चिंतन करून, वाणीचा निग्रह करून, भगवद्ध्यानामध्ये मी निमग्न होतो. चित्तातल्या सर्व वासना नष्ट झालेल्या आहेत. देहत्यागाला मी तयार आहे. आपल्या कृपेने माझं अज्ञान दूर झालेलं आहे. ""आचार्यांची पूजा राजाने केली आणि शुक्राचार्य महाराज नंतर त्या स्थानातून निघून गेले. भगवत्चिंतन करत राजा बसलेला आहे. समाधी अवस्थेपर्यंत तो पोचलेला आहे. त्याचं देहभान नाहीसं झालं. विप्रपुत्राच्या आदेशाप्रमाणे नागराज तक्षक हा परीक्षित राजाला दंश करायला निघालेला आहे. मार्गामध्ये नदीतीरावर एका मांत्रिक ब्राह्मणाची भेट झाली. तो मांत्रिक मोठा सामर्थ्यवान होता आणि परीक्षित राजाला वाचवायला तो चाललेला होता. त्याची शक्ती लक्षात घेऊन, त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य देऊन तक्षकाने परत पाठवलं. राजा समाधीमध्ये मग्न आहे. गर्दी बरीच जमलेली आहे. त्यावेळी तो तक्षक कुठून, कसा आला आणि केव्हा त्याने राजाला दंश केला. कळलं देखील नाही. त्या विषानीमध्ये परीक्षित राजाचं शरीर दग्ध होऊन गेलेलं आहे. आपल्या पित्याचा नाश तक्षकाने केला हे जनमेजय राजाला समजल्यावर त्याला अत्यंत राग आलेला आहे. मंत्रज्ञ ब्राह्मणांना बोलावून त्याने सर्पयाग सुरू केलेला आहे. कुंडामध्ये हजारो सर्प येऊन पडताहेत,
नष्ट होताहेत. जनमेजयाने विचारलं ऋत्विजांना, ""तो तक्षक अजून का कुंडामध्ये येऊन पडला नाही?' तक्षक इंद्राला शरण जाऊन त्याच्या आश्रयाला गेला होता. राजा म्हणाला त्या इंद्रालाही अग्निकुंडामध्ये आणून टाका. त्याप्रमाणे त्या ऋत्विजांनी आपल्या मंत्रप्रभावाने इंद्र, आणि तक्षक दोघांनाही आकर्षण करून यज्ञकुंडामध्ये दग्ध करण्याचं ठरवलं. बृहस्पतींनी येऊन जनमेजयाला सांगितलं, ""हा देवराजा, आणि हा सर्पराजा या दोघांनीही अमृतपान केलेलं आहे. यांचा नाश करणं बरोबर नाही. तुझा पिता गेला. तक्षक हा निमित्तमात्र आहे. जीवन-मरण हे आपल्या कर्माने आहे. मृत्यूकरता काहीतरी निमित्त होतं आणि मृत्यू येतो, तो ठरलेला असतो. सर्पदंश, अग्नि, वीज, रोगराई असं काहीतरी निमित्त होतं आणि ते शरीर पडतं. आता हे सर्पसत्र तू बंद कर. किती सर्प गेले, त्यांचंही नशीब होतं.' बृहस्पतीचं वचन मान्य करून, जनमेजयाने तो सर्पयज्ञ बंद केलेला आहे.
सूतजी सांगताहेत ऋषींना, ""व्यास महर्षींनी वेदाचे चार विभाग केले. त्यानंतर सगळी पुराणं रचली. पैल, वैशंपायन इत्यादिकांशी त्या वेदांचं अध्ययन केलेलं आहे. आमचे पिताजी जे आहेत, रोमहर्षण यांनी सर्व पुराणांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यांच्यापासून मी याचा अभ्यास केला," ऋषि म्हणाले, ""आमच्या कुळामध्ये जन्माला आलेले मार्कंडेय ऋषि यांचं चरित्र आम्हाला सांगा. ते चिरंजीव आहेत. त्यांना वटपत्रावर बालमुकुंदांचं दर्शन झालं असं आम्ही ऐकलेलं आहे. सूत सांगताहेत,
प्राप्तद्विजातिसंस्कारो मार्कण्डेयः पितुः क्रमात् ।।
छन्दास्यधीत्य धर्मेण तपःस्वाध्यायसंयुतः ।।
12.8.7 ।। श्री. भा.
मार्कंडेय ऋषि उपनयन झाल्यानंतर वेदाध्ययनाकरता गुरुगृही राहिलेले आहेत. आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. अध्ययन झालं, तपश्चर्या सुरू झालेली आहे. अखंड तपामध्ये ते निमग्न आहेत. कितीतरी काल गेलेला आहे.
कालो महान् व्यतीयाय मन्वन्तरषडात्मकः ।।
12.8.14 ।। श्री. भा.
सहा मन्वंतरं इतकी त्यांची तपश्चर्या झालेली आहे. भगवंताचं ध्यान अखंड चाललेलं आहे. योगाभ्यासामुळे चित्त स्थिर झालेलं आहे. इंद्राला भीती उत्पन्न झाली. त्यांचा तपोभंग करण्याकरता त्याने गंधर्व, अप्सरा पाठवल्या. त्यांनी नृत्यगायन केलं, परंतु मार्कंडेयांच्या मनावरती काहीही
परिणाम झाला नाही. त्यानंतर भगवान श्रीहरि नारायण हे प्रसन्न झाले आणि अनुग्रह करण्याकरता काय वर पाहिजे असं त्यांनी विचारलं. मार्कंडेयांनीही भगवंताची पुष्कळ स्तुती केलेली आहे, आणि मागितलं भगवंताला की ""आपली माया मला पाहायची आहे.' ""बरंय, पहा म्हणाले', असं म्हणून नारायण अदृश्य झाले. पुढे एकदा मार्कंडेय ऋषि आश्रमात असताना, संध्याकाळच्या वेळी जोरात पाऊस पडायला लागला. तो संपूर्ण आश्रम त्या पावसामुळे जलमय झाला. समुद्राची मर्यादा संपलेली आहे. आणि त्या जलामध्ये मार्कंडेय ऋषि वाहत चाललेले आहेत. नाकातोंडात पाणी जातंय. क्षुधा तृषा यांचा प्रतिकार करता येत नाही. जिकडे तिकडे अंधार पडलेला आहे. अशा रितीने पुष्कळ काळ गेला आणि शेवटी एका तीरावर येऊन ते पोहोचले. भूमीवर आले तिथे पाहताहेत, एक मोठा वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या एका पानावर एक दिव्य बालक निजलेलं आहे. आपल्या पायाचा अंगठा हातात धरून तो चोखायचं काम चाललेलं आहे.
करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् ।
वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ।।
त्या मुलाला पाहिल्याबरोबर ऋषींचे सगळे श्रम दूर झाले. मुलाला जवळ घ्यावं म्हणून मार्कंडेय ऋषि जवळ गेलेले असताना, त्याच्या श्वासाबरोबर उदरामध्ये गेले. तिथे पाहताहेत तर सर्व विश्व त्याठिकाणी आहे, आपला आश्रमही आहे. पुन्हा बाहेर पडले, पाहताहेत ते जल आहे. एकाएकी ते सगळं दृश्य नाहीसं झालं आणि मार्कंडेय ऋषि पुन्हा आपल्या आश्रमात आहेत. पाऊस नाही आणि जल नाही हे असं मायादर्शन त्यांना झालेलं आहे. शरण गेले भगवान श्रीहरींना आणि त्यांचं अखंड चिंतन करू लागले.
एकदा भगवान शंकर हे पार्वतीमातेसह जात असताना मार्कंडेय ऋषींच्या आश्रमाजवळ आले. त्यांनी पार्वतीला सांगीतलं, हा मोठा ऋषि आहे, नारायण भक्त आहे. याला आपण भेटून जाऊ या. आले आश्रमात. ऋषि डोळे झाकून समाधिस्थ आहेत. शंकर परमात्मा त्यांच्या चित्तामध्ये गेले. एकदम त्यांनी डोळे उघडले, नमस्कार केला. शंकरांची, पार्वतीची पूजा केलेली आहे. भगवान शंकरांनी त्यांना वर प्रदान केला आणि त्यांची स्तुतीही केली, "तुमच्यासारखे साधू हे सर्वोपकारक आहेत.
आकल्पान्ताद्यशः पुण्यं अजरामरता तथा ।
ज्ञानं त्रैकालिकं ब्रह्मन् विज्ञानं च विरक्तिमत् ।
ब्रह्मवर्चस्विनो भूयात् पुराणाचार्यतास्तु ते ।।
12.10.36 ।। श्री. भा.
हे मार्कंडेय ऋषे, तुझी कीर्ती कल्पांतापर्यंत राहिल. अजरामर तुम्ही व्हाल. सर्व ज्ञान विज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. ब्रह्मतेज प्राप्त होईल आणि पुराणाचार्य तुम्ही व्हाल. "सर्व पुराणातील निर्माण होणारे संदेह दूर करण्याचं कार्य हे मार्कंडेय ऋषींकडे आहे. पुराणं हे पौरुषेय वाङ्मय आहे. बुद्धीमध्ये काही संदेह निर्माण होतात. आणि त्यामुळे शांती राहात नाही. तो संदेह दूर करून, त्याचं रहस्य समजावून सांगणारे म्हणजे मार्कंडेय ऋषि आहेत. तो वर देऊन भगवान शंकर निघून गेले.
यापुढं सूतजींनी, तांत्रिक मार्गाने कशी कशी पूजा करतात तेही सांगितलेलं आहे. भगवंताची आयुधं म्हणजे काय काय आहे याबद्दलचं रहस्यही त्यांनी सांगितलेलं आहे.
बिभर्ति सांख्यं योगं च देवो मकरकुण्डले ।।
12.11.12 ।। श्री. भा.
सांख्य आणि योगही देवाची मकर कुंडलं आहेत. त्यांच्या कंठात असलेली वनमाला म्हणजे त्यांची माया आहे. पीतांबर म्हणजे छंदोमय वस्त्र आहे. आध्यात्मिक रीतीने त्याच विवरण केलेलं आहे. आणि अशा भगवंताची सेवा तंत्रमार्गाला अनुसरून भक्त करत असतात.
भगवान सूर्यनारायणांची प्रत्येक महिन्यात कोणकोणती रूपं आहेत, त्यांचा परिवार काय आहे हेही सूतजींनी सांगीतलं.
नंतर सूतजींनी भागवतामध्ये कोणते कोणते विषय आलेले आहेत ते सांगायला सुरवात केली. अवतरणिका, ऐकलेलं आहे त्यांना पुन्हा लक्षात यावं म्हणून सूत सांगताहेत.
एतद् वः कथितं विप्रा विष्णोश्चरितमद्भुतम् ।
भवद्भिर्यदहं पृष्टो नराणां पुरुषोचितम् ।।
12.12.2 ।। श्री. भा.
तुम्ही विचारल्याप्रमाणे हे भगवंताचं चरित्र सांगितलेलं आहे. पापक्षय करणाऱ्या भगवान श्रीहरीचंच यामध्ये पूर्ण वर्णन आलेलं आहे. भक्तियोग आहे, वैराग्य आहे. परीक्षित राजाचं आख्यान आहे. नारदांचं आख्यान आहे. राजर्षी परीक्षित राजा प्रायोपवेशन करून नदीतीरावर बसलेला आहे आणि शुकाचार्य महाराज त्याला उपदेश करायला आलेले आहेत. इतके विषय पहिल्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
विराट स्थूल रूपाच्या ठिकाणी चित्त धारणा करणं, सूक्ष्म स्वरूपाच्या ठिकाणी चित्त धारणा करणं, शरीरातून उत्क्रांती कशी करता येते, नारद ब्रह्मदेव संवाद, ब्रह्मदेवांकडून अनेक अवतारांचं कथन हे विषय दुसऱ्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
उद्धवजी-विदुर संवाद, विदुर-मैत्रेय संवाद, प्राकृतिक सर्ग, वैकृत सर्ग, ब्रह्मांड संभूती, स्थूल-सूक्ष्म कालाचं वर्णन, ब्रह्मदेवांची उत्पत्ती, सर्व प्रकारची सृष्टी उत्पत्ती, स्वायंभुव मनूची उत्पत्ती, त्यांची संतती, कर्दम-देवहूति चरित्र, कपिल अवतार, कपिल महामुनींचा देवहूतिला उपदेश, हिरण्याक्ष वध हे सर्वही विषय तिसऱ्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
सतीचं चरित्र, दक्षयज्ञ विध्वंस, ध्रुवचरित्र, पृथुराजाचं चरित्र, प्राचीनबर्हि राजाचं चरित्र हे सगळे विषय चौथ्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
प्रियव्रत, नाभी राजा, आग्नीध्र, राजांची चरित्रं, ऋषभदेवांचं चरित्र. भरत राजाचं चरित्र, सप्तसमुद्र, सप्तद्वीप, नद्या, पर्वत यांचं वर्णन, द्युलोकातल्या ज्योतिषचक्राचं वर्णन, सप्तपाताळांचं वर्णन, नरकांचं वर्णन हे सगळे विषय पाचव्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
दक्ष प्रजापतीच्या कन्या, त्यांच्यापासून झालेली संतती देव, असुर, मानव, प्राणी, पक्षी इ. अजामिळ चरित्र, वृत्रासुर नाश, हे सगळे विषय सहाव्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
प्रल्हाद चरित्र, नृसिंह अवतार, नारदांकडून धर्मराजाला सर्व वर्ण आश्रमांचे धर्म प्रतिपादन, हे विषय सातव्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
चतुर्दश मन्वंतरांचं वर्णन, गजेंद्र मोक्ष आख्यान, प्रत्येक मन्वंतरात झालेल्या भगवंताच्या अवतारांचं वर्णन, कूर्मावतार, धन्वंतरी अवतार, मोहिनी अवतार, मत्स्यावतार, वामनचरित्र हे सगळे विषय आठव्या स्कंधामध्ये आलेले आहेत.
सूर्यवंश आणि चंद्रवंश यातील राजांचं चरित्रं, शशाद, नृग, शर्याति, खट्वांग, मान्धाता, इत्यादि राजांची चरित्रं, भगवान रामचंद्रांचं चरित्र, भार्गवरामांचं चरित्र, पुरुरवा, ययाति, दुष्यंत, भरत, यदुराजा इत्यादि सर्व राजांची चरित्रं नवव्या स्कंधामध्ये आलेली आहेत.
भगवान गोपालकृष्ण जन्म, गोकुळातल्या लीला, शरद ऋतूमध्ये भगवंताने गोपींबरोबर केलेली रासक्रीडा, अनेक दैत्यांचा केलेला नाश, कंसाचा नाश, सांदीपनी गुरुमहाराजांचा मुलगा यमलोकातून परत आणून देणे, कालयवन वध, द्वारकानगरी निर्मिती, जरासंधाचा पराजय, रुक्मिणीहरण व विवाह, शंकरांशी युद्ध, शिशुपाल, शाल्व, पौण्ड्रक इ. राजांचा नाश, भारतीय युद्धात पांडवांचं निमित्त करून अगणित सैन्याचा नाश करून भूमीभार हलका केला, इत्यादी दिव्य कृष्णचरित्र दहाव्या स्कंधामध्ये आलेलं आहे.